पुणे | शहरात शिवसेना ठाकरे पक्षाला जागा किती?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पहिली यादी आज (दि. २३) जाहीर झाली. त्यामध्ये ६५ जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या यादीत पुणे शहरातील कोथरूड आणि हडपसर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव नसल्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत उमेदवार कोण असणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी केवळ दोन मतदारसंघ शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाट्याला आले आहेत. त्यामध्ये कोथरूड मतदारसंघात फिक्स उमेदवार आहे, तर दुसऱ्या हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्यामुळे सध्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा दावा आहे.
त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सोडणार का, असा प्रश्न आहे. तसे झाले, तर शिवसेनेच्या वाट्याला पुणे शहरात केवळ एकच जागांवर निवडणूक लढविता येणार.
दरम्यान, शिवसेनेची आज ६५ उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये किमान कोथरूड मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत होती.
मात्र, आजच्या यादीच कोथरूड किंवा हडपसर या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारी वेटिंगवर आहे. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवार कोण असणार? वाट्याला एक का दोन मतदारसंघ येणार? याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे.
कोथरूडला दोन नावांची चर्चा
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना काट्याची टक्कर देत शिवसेनेकडून गेलेला बालेकिल्ला भाजपकडून पुन्हा खेचून आणायचा असेल, तर शिवसेनेला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे.
त्यामध्ये सध्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, तर दुसरे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार अशी दोन नावे चर्चेत आहे. पृथ्वीराज सुतार हे शिवसेनेचे नेते, माजी कृषिमंत्री यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार, हे गुलदस्त्यात आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार महादेव बाबर यांचे नाव चर्चेत आहे.
जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील ग्रामीणमध्ये दोन (पुरंदर आणि खेड-आळंदी), पिंपरीमध्ये एक आणि पुणे शहरात दोन (कोथरूड आणि हडपसर) असे पाच ठिकाणी शिवसेनेचे अस्तित्व होते.
मात्र, मागील दहा वर्षांत हे अस्तित्व कुठेच राहिले नाही. त्यामुळे यंदा जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा येणार नाही. परिणामी जिल्ह्यातील पक्षाचे अस्तित्व संपल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता पुणे शहरातील या दोन जागांवर शिवसेनेची अस्तित्वाची लढाई असणार आहे.





