US-Iran War: भारताकडे खनिज तेलाचा पुरेसा साठा आहे. अशा परिस्थितीत होमुझ समुद्रधुनीतून तेल पुरवठ्यावर 45 दिवस परिणाम झाला तरी भारताला इंधनाची फारशी टंचाई भासणार नाही. तेल वाहतूक आणि साठ्यावर लक्ष ठेवणार्या केपलर या संस्थेने म्हटले आहे की, भारताकडील साठा आणि जहाजातून येणारे असे एकूण 100 दशलक्ष पिंप तेल उपलब्ध आहे. हे तेल भारताला 40 ते 45 दिवस पुरवू शकते. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के इतके खनिज तेल आयात करतो. मध्यपूर्वेत युद्ध सुरू झाल्यामुळे होमुझ समुद्रधुनीतून येणार्या 50% तेल पुरवठ्यावर परिणाम होत आहे. जर येथून तेल पुरवठ्यावर दीर्घ पल्ल्यात परिणाम झाला तर मात्र भारतासह विविध देशांना खनिज तेलाचा तुटवडा सहन करावा लागेल असे केपलर या संस्थेचे विश्लेषक सुमीत रोतालिया यांनी सांगितले. जर या भागातून जहाजाच्या वाहतुकीवर परिणाम झाला तर येथून तेलाचा पुरवठा थांबेल. मात्र खनिज तेल शुद्धीकरण करणार्या कंपन्या आपल्याकडे काही प्रमाणात इन्वेंटरी ठेवत असतात. त्याचबरोबर काही तेल जहाजावर लादलेले असते. ही जहाजे या भागातून निघालेली असतात. अशा प्रकारे भारताकडे साधारणपणे 100 दशलक्ष पिंप एवढे तेल सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध असल्याचे समजले जाते. हेही वाचा – युद्धभूमीतून मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा! इंडिगोची 13 विमाने झेपावणार; ‘या’ शहरांतील प्रवाशांना मिळणार प्राधान्य खनिज तेल कंपन्याकडे असलेल्या साठवणूक क्षमतेशिवाय भारताकडे मंगळूरु, पाडुर, विशाखापट्टणम येथे भूमिगत टँकमध्ये बरेच तेल साठविलेले असते. जर भारताला या भागातून प्रत्येक दिवसाला 2.5 दशलक्ष टन उपलब्ध झाले तर भारताच्या एकूण 50 दशलक्ष टनाच्या गरजेपेक्षा हे तेल निम्मे राहणार आहे. एकूण मूल्यांकन केले असता सध्या भारताकडे प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या उपलब्ध असलेले तेल 40 ते 45 दिवस पुरू शकते. भारताला निर्माण होणारी अडचण म्हणजे एकाच दिवसात खनिज तेलाच्या किमती दहा टक्क्यांनी वाढून 80 डॉलरवर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत खनिज तेलासाठी जास्त परकीय चलन मोजावे लागेल. 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षात भारताने खनिज तेलासाठी 137 अब्ज डॉलर खर्च केले. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या दहा महिन्यांमध्ये 206 दशलक्ष टन खनिज तेल आयात केले. यासाठी 100 अब्ज डॉलर मोजले आहेत. इराणने अमेरिकेचे तळ असलेल्या सौदी अरेबिया, कतार, कुवेत, बहरीन, इराक, जॉर्डन इत्यादी देशावरही हल्ले केले आहेत. हे हल्ले तेल केंद्रांनाजीक झाले आहेत. यामुळे तेल उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. होमुझ समुद्रधुनीतून जागतिक गरजेच्या 30 टक्के खनिज तेल आणि 20% नैसर्गिक वायू वाहून नेला जातो.