Raigad Diveagar beach : समुद्रातून बाहेर काढलं, तरी 8 विद्यार्थ्यांचा जीव कसा गेला? मृत्यूचं कारण आलं समोर
Raigad Diveagar beach : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (ता. १) सायंकाळी ही दुर्घटना घडली.

Raigad Diveagar beach : सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या ४८ विद्यार्थ्यांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगर येथे सहलीसाठी गेला होता. मात्र, दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आळंदी परिसरावर शोककळा पसरली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (ता. १) सायंकाळी ही दुर्घटना घडली. मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी अकरावी-बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्राला भरती आलेली असताना काही विद्यार्थी पाण्यात उतरले. यावेळी सुरुवातीला दोन विद्यार्थी समुद्रातील एका खड्ड्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी काही विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थीही पाण्यात अडकले. पाण्याचा प्रवाह वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली. विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांनी तातडीने समुद्राकडे धाव घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे ३० ते ३५ विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात यश आले. मात्र, आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. त्यांच्या नाकातोंडात पाणी आणि वाळू गेल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत विद्यार्थ्यांची नावे
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे यांचा समावेश आहे. सर्व मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून, या दुर्घटनेने विद्यार्थ्यांचे कुटुंबीय, मित्र आणि आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Hina Khan Birthday: घरच्यांना न सांगता मुंबई गाठली; छोट्या पडद्यापासून कान्सपर्यंत पोहोचली हिना खान





