Special Trains: पुणे-नागपूरसह मराठवाड्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांसाठी प्रयत्न
Special Trains: दसरा, दीपावली आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर पुणे, नागपूर आणि पाटणा मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Special Trains: दसरा, दीपावली आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर पुणे, नागपूर आणि पाटणा मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच नांदेड-पाटणा आणि नांदेड-सावंतवाडी विशेष रेल्वे सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सिकंदराबाद येथील प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक इती पांडे यांनी मराठवाडा रेल्वे प्रवासी असोसिएशनला दिली.
मराठवाडा रेल्वे प्रवासी असोसिएशनच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दसरा, दीपावली आणि छटपूजेच्या काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नांदेड-सावंतवाडी (पुणे व मनमाड मार्गे), संभाजीनगर-नागपूर आणि नांदेड-बिकानेरदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पुणे मार्गावरून नांदेड/हिंगोली-कल्याणदरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
जालना-यलहंका विशेष रेल्वेला दोन्ही बाजूंनी विस्तार देऊन संभाजीनगर-मैसूरदरम्यान कायमस्वरूपी रेल्वे सुरू करावी, बेंगळुरू-नांदेड दैनंदिन रेल्वे नागपूरपर्यंत वाढवावी, तसेच कोल्हापूर-नागपूर आणि अमरावती-पुणे रेल्वेचा ‘लूज टाइम’ दूर करून या गाड्या दररोज चालवाव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
रेल्वे प्रशासनातील अतिरिक्त मुख्य परिचालन व्यवस्थापक विशाल अर्जुन, अतिरिक्त परिचालन प्रबंधक विवेकानंद यल्लप्पा आणि अतिरिक्त कोच प्रबंधक रायडू यांची भेट घेऊन मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
देशातील विविध रेल्वे विभागांत दसरा व दीपावलीसाठी विशेष रेल्वेगाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या विभागासाठीही विशेष गाड्यांची तत्काळ घोषणा करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
या वेळी अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, प्रा. सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, दयानंद दीक्षित, खदीर लाला हाश्मी, माणिकराव शिंदे, रुस्तम कदम, रवींद्र बोरूळकर, प्रवीण थानवी आदी उपस्थित होते.





