इतका विरोध असूनही बायडेन अद्याप टिकले कसे? नेमका कोणाचा आहे पाठिंबा; अमेरिकेत चर्चा सुरू

वॉशिंग्टन – अमेरिकेची यंदाची अध्यक्ष पदाची निवडणूक विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासाठी जरा कठिणच आहे. त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात रोजच चर्चा झडत असताना त्यांच्याच डेमोक्रॅटीक पक्षाच्या काही ज्येष्ठ सदस्यांनीही बायडेन यांच्या उमेदवारीला हरकत घेत नाराजी व्यक्त केली आहे.
तथापि, एवढा विरोध होत असतानाही किंचितही न डगमगता बायडेन अद्याप रिंगणात ठामपणे उभे आहेत. माघार घेण्याची आपली मुळीच तयारी नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. नेमके कोणत्या कारणांंमुळे बायडेन एवढे आश्वस्त आहेत त्याची आता चर्चा होताना दिसते आहे.
यासंदर्भात दिल्या जात असलेल्या बातम्यांनुसार डेमोक्रॅटीक पक्षाचे किमान ८० नेते असे आहेत की ज्यांनी बायडेन यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या नेत्यांचे असे मानणे आहे की बायडेन यांचा ट्रॅक रेकॉर्ड असाधारण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना एक वेळा मात देणे हे बायडेन यांना अन्य नेत्यांच्या तुलनेत विशेष महत्व प्राप्त करून देते. केवळ एवढेच नाही तर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात बायडेन यांनी त्यांची जी पकड सिध्द केली आहे, तसेच या विषयावर ते कितीही वेळ ज्याप्रमाणे मोकळेपणाने बोलू शकतात तसे ट्रम्प यांना करता येऊ शकत नाही. परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातील अभ्यास बायडेन यांना ट्रम्प यांच्यावर मात करण्याची संधी बहाल करतो.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत नॉर्थ कॅरोलिनाच्या गव्हर्नरनेही हीच बाब जाहीरपणे सांगितली होती. ते म्हणाले होते की परराष्ट्र धोरणाच्या विषयावर ट्रम्प एक मिनीटही टीकू शकत नाहीत. विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी बायडेन यांना पर्याय म्हणून ज्या गेविन न्यूसॉम यांचे नाव चर्चेत होते त्यांनीच बायडेन यांच्यासंदर्भात ही मते मांडली आहेत. बायडेन आणि आपल्यातील मतभेद कमी झाले असून बायडेन यांच्यासाठी आपण पूर्ण सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याखेरिज कॉंग्रेस हिस्पॅनिक कॉकस या आणखी एका महत्वाच्या गटाने बायडेन यांच्यापेक्षा सक्षम उमेदवार दिसत नाही असे नमूद करत अडचणीच्या काळात त्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाच्या ४० सदस्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. ब्लॅक कॉकसचेही ६० सदस्य त्यांच्या बाजूने उभे आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतील जी अश्वेत मते आहेत तीही बायडेन यांच्याच बाजूने जाताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे मानवाधिकारांच्या रक्षणासाठी लढणारी व्यक्ती अशी बायडेन यांची प्रतिमा आहे तर ट्रम्प याची त्या विरोधातील प्रतिमा आहे.
अडचण कुठे झाली?
बायडेन यांनी लाइव्ह भाषणात अशी चूक केली की ज्याची त्यांच्याडून अपेक्षा नव्हती. कमला हॅरिस यांना ट्रम्प म्हणणे, झेलेन्स्की यांना पुतीन म्हणणे अशा गंभीर चुका त्यांच्याकडून अनावधानाने झाल्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. मात्र स्वत: बायडेन यांचे असे म्हणणे आहे की वय झाल्यावर माणूस अधिक विवेकाने आणि अधिक चांगल्या पध्दतीने काम करतो. आपण पूर्णपणे फिट आहे हे सिध्द करण्यासाठी आपण मेन्टल टेस्टही करू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.





