Mohammed Shami : रणजीसाठी फिट, मग वनडेसाठी अनफिट का? शमीच्या खरमरीत प्रश्नावर आगरकरांचं स्पष्टीकरण

काय म्हणाला होता शमी?
मोहम्मद शमीने मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान न मिळाल्याबद्दल निवड समितीवर निशाणा साधला होता. तो म्हणाला होता, “मी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी खेळत आहे, यावरून मी फिट आहे हे सिद्ध होते. माझ्या फिटनेसची अपडेट देणे माझे काम नाही.” शमी पुढे म्हणाला, “निवड माझ्या हातात नाही. जर फिटनेसचा मुद्दा असता, तर मी इथे चार दिवसीय सामना खेळलो नसतो. मी चार दिवसीय सामना खेळू शकतो, तर ५० षटकांचा क्रिकेटही खेळू शकतो.”
आगरकरांनी काय दिले स्पष्टीकरण?
दिल्लीतील एका कार्यक्रमात शमीच्या फिटनेसबाबत विचारले असता, आगरकर म्हणाले, “शमी हा भारतासाठी अविश्वसनीय खेळाडू आहे. जर तो काही बोलला असेल, तर आम्ही त्याच्याशी चर्चा करू. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच आम्ही स्पष्ट केले होते की, तो पूर्णपणे फिट असेल तरच संघात स्थान मिळेल. दुर्दैवाने, तो तेव्हा फिट नव्हता. आता देशांतर्गत हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे आम्ही त्याची फिटनेस तपासू.”
हेही वाचा –क्रिकेट विश्वात नव्या फॉरमॅटचा उदय! काय आहे ‘Test Twenty’ फॉरमॅट? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
मोहम्मद शमी शेवटचा जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर टाच आणि गुडघ्याच्या दुखापतींमुळे त्याला २०२३ विश्वचषकानंतर शस्त्रक्रिया करावी लागली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने वरुण चक्रवर्तीसह भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. शमीच्या या वक्तव्यानंतर आणि आगरकर यांच्या स्पष्टीकरणानंतर, शमीचा फिटनेस आणि भारतीय संघातील त्याच्या स्थानाबाबत चर्चा पुन्हा तापली आहे. निवड समिती आता शमीच्या फिटनेसवर लक्ष ठेवून पुढील निर्णय घेणार आहे.





