मागच्या २४ तासात पुण्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड ; ४५ ठिकाणी झाडे कोलमडली

Pune Rain । सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मागच्या २४ तासात शहरात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर झाडेही कोलमडल्याच्या घटना घडल्या आहेत.
पुण्यात काल पासून आजसकाळी सात वाजेपर्यंत अग्निशमन दल नियंत्रण कक्षात अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याच्या घटनांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये झाडे कोसळण्याच्या एकूण ४५ घटना घडल्या आहेत. तर २ ठिकाणी घरे पडल्याचे माहिती आहे. तसेच भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली तर कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीक भिंत पडली असल्याची माहिती समोर येतीय.
दरम्यान, पुण्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. यात वारजे, स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत – शिवणे, सदगुरू सोसायटीत – सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये – नदीपाञ रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौक – शिवाजीनगर याठिकाणी पाणी शिरले आहे.
तर या सगळ्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम करत आहेत. दरम्यान, या सर्व घटनांमध्ये अद्याप कुठे ही जखमी वा जिवितहानी झाली नसल्याची माहिती पुढे येत आहे.





