पुणे (प्रभात वृत्तसेवा) – राज्यातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याचा करोना बाधित दर सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. मागील आठ दिवसांत या दोन्ही जिल्ह्यातील बाधित दर अडीच ते तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोल्हापूरमध्ये सध्या 10, तर सातारा जिल्ह्यात 9.1 टक्के इतका बाधित दर आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील बाधित दरामध्येही किंचीत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. या आठवड्यात 14 लाख 74 हजार 509 नमुने तपासणीतून 66 हजार 616 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे राज्यातील साप्ताहिक बाधित दर 4.5 टक्के इतका आहे. त्यानुसार बाधित दर पाहिला तर केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांच्या संख्येतून बाधित दर 5.7 टक्के इतका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 19 हजार 716 जणांच्या नमुने तपासणीतून 11 हजार 922 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सातारा जिल्ह्यात 64 हजार 345 नमुने तपासणीतून 5 हजार 831 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील बाधित दर दहा टक्क्यांच्या घरात गेला आहे. त्यापाठोपाठ पुणे आणि सांगली जिल्ह्यातील बाधित दरामध्ये किंचीत 0.1 आणि 0.2 ने वाढ झाली. तर रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील बाधित दरामध्ये किंचीत घट झाली आहे. जिल्हा बाधित दर कोल्हापूर 10 पुणे 7.3 रायगड 7.9 रत्नागिरी 7.4 सांगली 8.8 सातारा 9.1 सिंधूदुर्ग 6.7 गोंदिया 0.2 नांदेड 0.3 नंदुरबार 0.4