पालखी मार्ग अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ ; वैष्णवांसाठी धोक्याची घंटा

संबंधित विभाग निद्रिस्त
वाल्हे – जुन्या जेजुरीहून-नीरा दिशेकडे जाताना पालखी महामार्ग असलेले अरूंद पुल व त्या पुढे लगेच रस्ता “रूंद – अरुंद’ होत असल्याने हा भाग अपघाताचे ठिकाण झाले आहे. दरम्यान, गुरूवारी (दि. 8) याच ठिकाणी एका भरधाव चारचाकी वाहनाने एका दुचाकीस जोरदार धडक दिल्याने, दुचाकीवरील महिलेला जीव गमवावा लागला.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनीही शुक्रवार (दि. 9) याच पालखी महामार्गाचा व पालखी तळाचा पहाणी दौरा केला होता. या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी (दि. 10) जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या पुढे भोरवाडी फाटा येथे चौपदरीकरण असणारा रस्ता अचानक दुपदरी होतो. याच ठिकाणी एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाल्याने पालखी मार्ग अपघातांचा हॉटस्पॉट ठरला असल्याने वैष्णवांसाठी ही घोक्याचीच घंटा म्हणावी लागेल.
भोरवाडी येथील पहिल्या अपघातात अवघड वळणावर चारचाकी वाहन लोहमार्गावर जाऊन पडले. तर दुसरा अपघातात हा वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस व कोंबड्याची वाहतूक करणारा पिकअप यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये जवळपास 23 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे.
एकाच दिवशी सलग दोन अपघात झाले असून, सुदैवाने या अपघातात कोणी मृत्यू झाले नाही. तसेच याच मार्गावर पुढे अत्यंत धोकेदायक अवघड वळण असून, मागील महिन्यात बुधवारी (दि.24 मे) खाद्यपदार्थाची वाहतूक करणारा ट्रक अवघड वळणाचा अंदाज न आल्याने चक्क 15 फूट खोल असलेल्या लोहमार्गावर जाऊन उलटला होता. सुदैवाने यावेळी या लोहमार्गावर कोणतीही रेल्वे आली नसल्याने, मोठा अपघात टळला होता. यावेळी ट्रक चालक जखमी झाला होता.
प्रशासनाकडून अवदार्य नाहीच
हा धोकेदायक स्पॉट दैनिक “प्रभात’ने याआधी कित्येक वेळा सांगितले असूनही, या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेण्याचे अवदार्य प्रशासनाकडून दाखवले जात नाही. पालखी सोहळ्यापूर्वी तकलादु कळकाचे खांब लावले जातील, त्यांना रेडियम ही लावले जाईल, मात्र पालखी परतीच्या प्रवासाच्या वेळी हे खांब त्या ठिकाणी नसतील हे मात्र नक्की.
संबंधित विभागाला त्याच रस
12 महिने पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर दररोज पंढरपूर एसटी बस किमान 40 तरी धावतात. तसेच इतर बस 60 धावतात. वर्षभरात अनेक लहान-मोठे अपघात या पालखी महामार्गावर होत असतात. यामध्ये अनेक निष्पापांचे जीव गेलेत. तर अनेकजण कायमचे जायबंदी झालेत. हा पालखी महामार्ग मृत्यूचा सापळा तसाच ठेवण्यात संबंधित बांधकाम विभागाला रस असावा, अशी चर्चा आता ग्रामस्थ व प्रवाशांमध्ये आहे.





