हॉटेल, रेस्टॉरंटही होणार सुरू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सूतोवाच

मुंबई – “मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यातील उद्योग-व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. यानंतर आता हॉटेल आणि रेस्टॉरंटही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा करोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर परवानगी देण्यात येईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांस कामगार व कर्मचाऱ्यांची कपात करू नये, अशी सूचना केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, या करोना युद्धात मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स आमच्याबरोबर आहेत, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल.
कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी यांना धोका निर्माण होवू शकतो. आत्ताच आपण सलूनला परवानगी दिली आहे. पण जिम अद्यापही बंदच ठेवले आहे. कारण अशा गर्दीच्या ठिकाणांहून करोनाच संसर्ग होण्याचा धोका संभावतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वयंशिस्तही महत्वाची – आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करताना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे.
या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. करोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.





