“लघुशंका करू नका” म्हणाल्याचा रागातून जामखेडमध्ये गोळीबार, हॉटेल व्यवसायिकाचा मुलगा जखमी

जामखेड : अहिल्यानगरमधील जामखेड शहरात ‘इथे लघुशंका करू नका, महिला आहेत’ असे सांगितल्यामुळे रागावलेल्या तिघांनी थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे तरुण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोर फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
रविवारी (१ जून) रात्री १० वाजेच्या सुमारास विंचरणा नदीवरील नव्या पुलाजवळ काही महिला आणि नागरिक उपस्थित असताना, एका चारचाकीमधून आलेल्या तिघांनी सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. यावेळी आदित्य बबन पोकळे (२०) या युवकाने त्यांना अडवले आणि महिलांची उपस्थिती असल्याचे सांगितले. या सूचनेचा राग आल्याने त्या तिघांनी त्याच्यावर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
घटनेदरम्यान कुणाल बंडू पवार (२०), स्थानिक हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा, घटनास्थळी पोहोचला आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांनी थेट पिस्तूल काढून दोघांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात कुणालच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. दोघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुणालची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, कर्जतचे उपविभागीय अधिकारी आणि पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोर फरार झाले असून, पोलिसांनी वाहन क्रमांकाच्या आधारे शोधमोहीम सुरू केली आहे. तीन विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत.
सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं : रोहित पवार
दरम्यान, या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आलो आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही.
जामखेडमध्ये रात्री एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना दहशतीत राहावं लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं.”





