पुणे जिल्हा | हॉटेल, बार, रेस्टॉरंट व्यावसायिकांनी परवानगी घेऊनच बांधकाम करावे

पिरंगुट, (वार्ताहर) – पीएमआरडीए हद्दीत अनेक हॉटेल, बार, रेस्टॉरंट आहे. या व्यवसायिकांनी रीतसर बांधकाम परवानगी घेऊनच बांधकाम व व्यवसाय करावा, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
मुळशी आणि हवेली तालुक्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट व्यवसायिकांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यावसायिकांनी आपल्या व्यथा आयुक्तांसमोर मांडल्या. त्यांनी त्या व्यवस्थित ऐकून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले. मुळशी हॉटेल बार रेस्टॉरंट संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
पुण्यामधील पोर्शे कार अपघात प्रकरण झाल्यानंतर पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका हद्दीमधील हॉटेलवर हातोडा पडणार असून त्याची यादीच पीएमआरडीएने जाहीर केलेली आहे. त्यामधील काही हॉटेलवर हातोडा पडला असून, पूर्णपणे भुईसपाट केलेली आहेत. याच संदर्भात या सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट व्यावसायिकांनी आयुक्तांची भेट घेतली.
दोन्ही तालुक्यामधील व्यावसायिक हे स्थानिक असून शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यामुळे पीएमआरडीएने कारवाई करताना त्यांचा विचार करावा आणि कारवाई करावी. तसेच जे आत्ता हॉटेल, बार, रेस्टॉरंटची बांधकामे आहेत त्यांना नियमित करण्यासाठी वेळ देण्यात यावी.
अशी मागणी यावेळी व्यवसायिकांनी आयुक्तांना केली. यातील अनेक हॉटेल, बार, रेस्टॉरंट व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे या कारवाईमध्ये जर ते पाडले तर आम्हाला रस्त्यावर यावे लागेल असे यावेळी काही तरुण हॉटेल व्यवसायिकांनी सांगितले.
व्यावसायिक म्हणतात..
बांधकामे नियमित करण्यासाठी शासकीय कागदपत्रे मिळण्याला विलंब होतो. त्यामुळे थोडासा वेळ आम्हाला देण्यात यावा. आम्ही जी काही बांधकामे आहेत ते नियमित करण्यासाठी आपल्याकडे अर्ज करतो असे यावेळी हॉटेल, बार, रेस्टॉरंट व्यावसायिकांनी सांगितले.





