तनिषाच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; स्वतःला वाचवण्यासाठी मंगेशकर हॉस्पिटलचा खोटेपणा : रुपाली चाकणकर

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची लाट उसळल्याचं चित्र दिसून येत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती देखील नेमण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे.
यावेळी भिसे कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात डॉ. घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला आहे. तसेच डॉ घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील नातेवाईकांनी या पत्रातून केली. या लेखी पत्रानंतर आज यासंदर्भात बैठक पार पडली.
या बैठकीनंतर शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात आला. हा अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना वाचून दाखवला. यावेळी त्यांनी तनिषा भिसेंच्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालयचं जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. यावेळी त्यांनी रूग्णालयाने रूग्णाच्या खासगी माहिती अहवालातून दिल्याने चाकणकरांनी निषेध व्यक्त काल असून याबाबत त्यांनी दीनानाथ रूग्णालयाला समज देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, राज्य शासनाने सादर केलेल्या प्रथमदर्शनी अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आढळले आहे. मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूला रुग्णलयच जबाबदार असल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाले आहे. तसेच याप्रकरणी अजून दोन अहवाल बाकी असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना म्हणाल्या, अहवालामध्ये रुग्ण हा सकाळी ९ वाजून १ मिनिटाने रुग्णालयात दाखल झाला. तिच्या ऑपरेशनची देखील तयारी करण्यात आली होती. मात्र, रुग्णाला १० लाखांचे डिपॉझिट भरण्यास सांगितले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकाईकांनी काही रक्कम भरण्याची तयारी दाखवली होती. मात्र, रुग्णावर उपचार करण्यात आले नाहीत. रुग्णाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना रुग्णालयाकडून कुठलेही उपचार करण्यात आले नाहीत. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनाच तुमच्याकडे कुठलेही औषध असेल तर ते रक्तस्त्राव थांबण्यासाठी द्या असे सांगण्यात आले, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
रूग्णांच्या नातेवाईकांचा असा दावा आहे की, मंगेशकर रुग्णालयाने आमच्यावर उपचार करायला तयार असल्याचे सांगितले. शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी झालेली असताना मात्र, पैसे वेळेत भरु न शकल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता, रक्तस्त्राव सुरूच होता, रुग्णाचे मानसिक खच्चीकरण झाले, रूग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं आवश्यक होतं, त्यांनी उपचार करणं गरजेचं होतं, पण त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.





