Hospital Fire Safety : रुग्णालये की ‘अग्निसापळे’? पिंपरी-चिंचवडमधील ५३६ हॉस्पिटल्सकडे फायर एनओसीच नाही!
Hospital Fire Safety : वैद्यकीय आणि अग्निशमन विभागात विसंवाद; त्रुटी असूनही रुग्णालयांना अभय कोणाचे? हजारो निष्पाप रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप.

Hospital Fire Safety – नागपूर येथील शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला गुरुवारी (दि. १४ मे) रोजी लागलेल्या आगीने राज्यभरात खळबळ उडाली असतानाच पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील तब्बल ८० टक्के रुग्णालयांकडे अजूनही अग्निशमन विभागाची अधिकृत एनओसी नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शहरातील शेकडो रुग्णालये ही प्रत्यक्षात ‘अग्निसापळे’ बनल्याची भीती व्यक्त होत आहे.
दोन विभागांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे तसेच प्रशासनाच्या दिरंगाई आणि नियमांच्या सैल अंमलबजावणीमुळे हजारो रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सध्या ६७४ रुग्णालये कार्यरत आहेत. मात्र यापैकी फक्त १३८ रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे वैध ना हरकत प्रमाणपत्र आहे. उर्वरित ५३६ रुग्णालये एनओसीशिवाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे १९५ रुग्णालयांनी अर्ज केले असले तरी त्यांच्या अग्निसुरक्षा यंत्रणांमध्ये त्रुटी आढळल्याने मंजुरी प्रलंबित आहे. याचा अर्थ शहरातील केवळ २० टक्के रुग्णालयांनी अग्निसुरक्षेचे नियम पूर्ण केले आहेत. बाकीच्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक व्यवस्था आहे की नाही, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिल्लीतील रुग्णालयातील भीषण आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कठोर भूमिका घेतली होती. ज्या रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाची एनओसी नाही, त्यांचे परवाने नूतनीकरण करू नयेत, असे आदेश त्यांनी दिले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर हे धोरण थंडबस्त्यात गेल्याचे चित्र आहे. वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागातील समन्वयाच्या अभावामुळे एनओसी नसतानाही शेकडो रुग्णालये सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
काळेवाडीतील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीनेही प्रशासनाला जाग आणली नव्हती. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर रुग्णालय सुरू होते. विशेष म्हणजे त्या रुग्णालयाकडे अग्निशमन विभागाची एनओसी नव्हती. तरीही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्याची नोंदणी केली होती. या घटनेनंतर ‘बी फॉर्म’च्या आधारे रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून खासगी एजन्सींनी दिलेल्या ‘बी फॉर्म’वर विश्वास ठेवून नोंदणी केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक एजन्सी प्रत्यक्ष पाहणी न करता किंवा तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करून प्रमाणपत्रे देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षात कार्यरत आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
धोकादायक परिस्थिती
शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये अरुंद जिने, अपुरे आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, निकृष्ट अग्निशमन यंत्रणा आणि पार्किंगमुळे अडथळा निर्माण होणारे प्रवेशद्वार अशी धोकादायक परिस्थिती असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रे केवळ दाखवण्यासाठी ठेवण्यात आली असून त्यांची नियमित तपासणी होत नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणी अग्निसुरक्षा ही केवळ औपचारिकता नसून जीव वाचविण्याची अत्यावश्यक यंत्रणा आहे. अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन लाइन, जनरेटर आणि विद्युत उपकरणांमुळे रुग्णालयांमध्ये आगीचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत एनओसीशिवाय रुग्णालये सुरू ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
“राज्यात सर्वत्र ‘बी फॉर्म’च्या आधारे नोंदणी केली जाते. यंत्रणा सक्षम आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी अग्निशमन विभागाची आहे.”
– डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकिय अधिकारी






