Jejuri Accident: सासवड-जेजुरी मार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची वारकऱ्यांना धडक, 3 जणांचा मृत्यू
Jejuri Accident: जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती

पुणे : आषाढी वारी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात पालखी सोहळ्यापासून सुमारे १२ किलोमीटर पुढे घडला. त्या वेळी पालखी बोरावके मळा परिसरात होती. वारकरी व वाहनांची सुरक्षित हालचाल व्हावी यासाठी रस्ता डिव्हायडरद्वारे विभागण्यात आला होता. उजवी बाजू वाहनांसाठी तर डावी बाजू पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र काही वारकरी वाहनांसाठी राखीव असलेल्या मार्गावरून चालत असल्याचे समोर आले आहे.
७० वर्षीय ट्रक चालकाने ताप व सर्दीचे घेतले होते औषधे
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक वाहनांसाठी राखीव असलेल्या मार्गाने जेजुरीकडे जात होता. त्याचवेळी सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज येथील दिंडीतील सात महिला वारकरी त्या मार्गावर होत्या. प्राथमिक चौकशीनुसार, ७० वर्षीय ट्रक चालक ताप व सर्दीमुळे औषधे घेत असताना वाहन चालवत होता. जेजुरीच्या दिशेने जाताना दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याने ट्रक अचानक डावीकडे वळविल्याने ट्रकने सात महिला वारकऱ्यांना जोरदार धडक दिली.
मृत महिलांची नावे
या भीषण अपघातात नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज), माधवी राजाराम सालगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे दिग्रज, ता. मिरज) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलिमकर तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्य, वाहतूक नियंत्रण, पंचनामा आणि पुढील तपासाचे काम हाती घेतले.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून चालकाची वैद्यकीय स्थिती, वाहनाचा वेग तसेच इतर संबंधित घटकांचा तपास केला जात आहे. या प्रकरणी कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जखमींची जेजुरी ग्रामीण रुग्णालयात भेट घेतली आहे. त्यानंतर त्या गंभीर जखमी असलेल्या महिलांना भेटण्यासाठी जेजुरी येथील खासगी रुग्णालयात जाणार आहेत.
हेही वाचा:





