Chandrapur : भयानक घटना! दबा धरून बसलेल्या वाघाचा 13 जणांवर हल्ला; 4 महिलांचा जागीच मृत्यू
Chandrapur : हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की महिलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रात वाघाच्या भीषण हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाल्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील ‘भट्टी मोहल्ला’ परिसरातील 13 महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. खैरीचक परिसरातील जंगलात त्या काम करत असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या एका मादी वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. (Chandrapur)
हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की महिलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर महिलांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढल्याने त्या थोडक्यात बचावल्या. आपल्या सहकाऱ्यांना वाघाने ओढून नेत असल्याचं दृश्य पाहून उर्वरित महिला हादरून गेल्या आहेत.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चारही महिला एकाच वॉर्डातील आणि नातेवाईक असल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत महिलांची नावे: (Chandrapur)
कविता दादाजी मोहुर्ले (45)
अनिता दादाजी मोहुर्ले (46)
संगीता संतोष चौधरी (40)
सुनीता कौशिक मोहुर्ले (35)
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
Chandrapur : भयानक घटना! दबा धरून बसलेल्या वाघाचा 13 जणांवर हल्ला; 4 महिलांचा जागीच मृत्यू
दरम्यान, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या वाघिणीचा तातडीने बंदोब स्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.
हेही वाचा : Pune News : अधिकमासानिमित्त चंदुकाका सराफ यांचा पारंपरिक चांदी व दागिन्यांचा खास संग्रह!





