Pakistan Accident : पाकिस्तानमध्ये भीषण अपघात.! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ४० जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात एक प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान ४० प्रवासी ठार झाले आहेत.

Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात एक प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान ४० प्रवासी ठार झाले आहेत. पेशावरला जाणारी बस बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथून निघाली होती. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात पोहोचल्यानंतर हा अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
डोंगराळ भागातील एका अवघड वळणावर बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले असावे आणि बस रस्त्यावरून घसरून दरीत कोसळली असावी, असा निष्कर्ष प्राथमिक तपासामध्ये काढला गेला आहे.
मात्र, अपघाताच्या कारणाची अधिक तपासणी करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान या दोन्ही प्रांतांमधील जिल्हा प्रशासन, बचाव पथक आणि इतर संबंधित विभाग बाधित व्यक्तींना मदत पुरवत आहेत. अपघात झाला, तेंव्हा बसमध्ये ४८ प्रवासी होते.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. अपघातामधील मृत प्रवाशांच्या कुटुंबियांबद्दल त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.






