प्रभात वृत्तसेवा पुणे – नगर रस्त्यावर थांबलेल्या ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रंजीत छोटन मिश्रा (३५, रा. बालाजीनगर, वडगावशेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक माने यांनी वाघोली पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रंजीत मिश्रा शनिवारी (१५ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोेली परिसरातून निघाला होता. कटकेवाडीजवळ असलेल्या परफेक्ट वजनकाट्याजवळ लोखंडी साहित्य घेऊन निघालेला ट्रक थांबला होता. रस्त्याकडेला लावलेल्या ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू केले नव्हते. त्यामुळे अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही. दुचाकीस्वार मिश्रा ट्रकवर पाठीमागून आदळला. अपघातात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दुचाकीस्वार मिश्राला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. दुचाकीस्वाराच्या मृत्यूस जबाबदार असल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राघू तपास करत आहेत.