Asia Cup 2025 : हाँगकाँगच्या गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथाच खेळाडू

Ateeq Iqbal records in Asia Cup 2025 : आशिया कप 2025 ची सुरुवात आज अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर अफगानिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने झाली. अफगानिस्तानचा कर्णधार राशिद खान याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हाँगकाँगचा कर्णधार यासिम मुर्तझा यानेही या निर्णयाचे स्वागत केले आणि सांगितले की, त्यांनाही प्रथम गोलंदाजीच करायची होती. हाँगकाँगने पॉवरप्लेमध्येच दोन विकेट्स घेऊन आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. यादरम्यान अतीक इकबालने इतिहास रचला.
अतीक इकबालचा मेडन ओव्हरसह विकेटचा पराक्रम –
अफगानिस्तानच्या डावातील चौथे षटक अतीक इकबालने टाकले. त्याच्यासमोर इब्राहिम झद्रान फलंदाजीला होता. पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव झाली नाही. दुसऱ्या चेंडूवर मध्यमगती गोलंदाज अतीकने चांगल्या लेंथचा चेंडू टाकला. हा चेंडू ड्राइव्ह करण्यायोग्य नव्हता, तरीही झद्रानने ड्राइव्हचा प्रयत्न केला. चेंडू स्विंग झाला आणि बॅटचा किनारा घेऊन यष्टीरक्षक झिशान अलीच्या हातात गेला. झिशानने स्टंपजवळ उत्तम झेल टिपला.
अतीक इकबाल ठरला जगातील चौथा गोलंदाज –
Pin point precision 🎯
Ateeq bringing the heat, sending Zadran packing in what was an exceptional over! 🔥 #AFGvHK #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/Wo4FgaZqTa
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 9, 2025
इब्राहिम झद्रान चार चेंडूंवर एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर मोहम्मद नबी फलंदाजीसाठी उतरला. अतीक इकबालच्या पुढील चार चेंडूंवर नबीला एकही धाव काढता आली नाही. अशा प्रकारे अतीकने मेडन षटक टाकताना विकेटही घेतली. यासह, टी-20 आशिया कपच्या पॉवरप्लेमध्ये विकेट घेऊ मेडन ओव्हर टाकणारा अतीक इकबाल हा चौथा गोलंदाज ठरला. या यादीत भारताचा भुवनेश्वर कुमार याचाही समावेश आहे.
टी-20 आशिया कप पॉवरप्लेमधील विकेट घेऊन मेडन ओव्हर टाकणारे गोलंदाज :
- मोहम्मद आमिर (पाकिस्तान) वि. यूएई, मीरपूर, 2016
- भुवनेश्वर कुमार (भारत) वि. यूएई, मीरपूर, 2016
- शाहनवाज दहानी (पाकिस्तान) वि. हाँगकाँग, शारजा, 2022
- अतीक इकबाल (हाँगकाँग) वि. अफगानिस्तान, अबू धाबी, 2025





