Parvesh Verma : मा. मुख्यमंत्र्यांचा पुत्र, दोन टर्म खासदार; केजरीवाल यांना धोबीपछाड देणाऱ्या परवेश वर्मांचा इतिहास मोठाय

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभवाची धूळ चारली आहे. वर्मा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयामुळे केजरीवाला यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, तीन टर्म दिल्लीवर आपले सत्ता कायम ठेवणाऱ्या केजरीवाल यांना पराभूत करणारे प्रवेश वर्मा नक्की आहेत कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत…..
शिक्षण
परवेश वर्मा हे राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य आहेत. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1977 रोजी दिल्लीत झाला. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. वर्मा अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून वाणिज्य पदवी (B.Com) आणि फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीएचे शिक्षण घेतले आहे.
दोन टर्म खासदार
2013 मध्ये परवेश वर्मा यांनी मेहरौली विधानसभा मतदारसंघातून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगानंद शास्त्री यांचा पराभव त्यांनी केला होता. त्यानंतर वर्मा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभेची जागा जिंकून खासदार झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांचा तब्बल 78,486 मतांच्या फरकाने पराभव केला, जो दिल्लीच्या इतिहासातील सर्वात मोठा फरक होता.
तिरंगी लढतीत शर्मांचा दणदणीत विजय
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे केले, जिथे त्यांचा सामना आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्याशी झाला. प्रवेश वर्मा यांनी या जागेवर नेत्रदीपक विजय नोंदवला असून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.
संपत्ती किती?
परवेश वर्मा यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली आहे. निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रवेश वर्मा यांच्याकडे सध्या तीन कार आहेत, ज्यात 36 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा, 9 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि 11.77 लाख रुपयांची महिंद्रा एक्सयूव्ही यांचा समावेश आहे. यासोबतच त्यांच्याकडे 2 लाख 20 हजार रुपयांची रोकड आहे.
प्रवेश वर्मा यांनी त्यांची जंगम मालमत्ता ७७ कोटी ८९ लाख ३४ हजार ५५४ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर एकूण 12 कोटी 19 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याचाच अर्थ त्यांच्याकडे 90 कोटी रुपयांची संपत्ती आहे. परवेश वर्मा यांच्या संपत्तीमध्ये शेतजमीन, गोदामे आणि घरांचा समावेश आहे.
विविध पदांवर काम
प्रवेश वर्मा संसदेच्या वित्त समितीचे सदस्यही राहिले आहेत. त्यांनी संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते यांच्या संयुक्त समितीवरही काम केले आहे. वर्मा यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले असून विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी यश मिळवले आहे.





