निवारा केंद्रे ठरताहेत बेघरांचा आसरा

महापालिका : शहर सोडणाऱ्या 395 जणांची केंद्रामध्ये व्यवस्था
पिंपरी – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबला पाहिजे यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न सुरू असतानाच पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील आता बेघर असणाऱ्या व्यक्तींना तात्पुरता निवारा देण्यासाठी विविध शाळांमध्ये राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे बेघरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निवारा केंद्रात शहर सोडून जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी सुरक्षित असताना बेघर, काम धंदा गेलेल्या अशा व्यक्तींनी कुठे आसरा घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या, शहर सोडून चाललेल्या व्यक्ती, कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था पालिकेच्या विविध शाळांमध्ये करण्यात आली आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबावा यासाठी पिंपरी चिंचवड प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्यांतर्गत पालिकेच्या 8 प्रभागांत असलेल्या 12 शाळांमध्ये निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना चहा, नाश्ता, आणि दोन वेळ जेवण देण्यात येत आहे. या शिवाय पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री मंडईजवळील रिकाम्या गाळ्यामध्येही तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. सध्या या निवारा केंद्रामध्ये 395 जणांना ठेवण्यात आले आहे.
जीव धोक्यात घालून शहर सोडण्याचा प्रयत्न
शहरात बांधकाम ठेकेदारांकडे कामाला असलेले हे बहुतांश कामगार आहेत. त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबीयांकडे परतण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू होता. मध्यप्रदेश, हरियाणा, झारखंड या भागातील मजुरांची संख्या अधिक आहे. त्यांच्या सोबत त्यांची लहान मुले आहेत. मात्र जीव जोखमीत घालून हे मजूर शहर सोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सहायक आयुक्त उल्हास जगताप यांनी सांगितले. यांना शिवभोजन योजनेतून जेवण दिले जात असल्याचेही जगताप म्हणाले.





