जीएसटी कपात आणि सणासुदीच्या उत्साहात घर विक्रीला बूस्ट: क्रेडाईचा आशावाद

सिंगापूर – जीएसटी परिषदेने बहुतांश वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केल्यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढणार आहे. अशा परिस्थितीत उत्सवाच्या काळात घरांची मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे मत भारतातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईने व्यक्त केले आहे.
क्रेडाईचे भारतात 13,000 सदस्य आहेत. बांधकामासाठी लागणारे सिमेंट आणि इतर साहित्याच्या जीएसटी दरात कपात केल्यामुळे बांधकामाचा खर्च त्या प्रमाणात घटणार असतानाच ग्राहकांची क्रयशक्ती वाढणार आहे. त्यातच दसरा आणि दिवाळीत घर खरेदी करण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत असतात. त्यामुळे या मुहूर्ताच्या काळात घर विक्री वाढण्याची शक्यता या संस्थेला वाटते.
क्रेडाई आयोजित करीत असलेल्या वार्षिक आंतरराष्ट्रीय समारंभावेळी पत्रकाराशी बोलताना क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सांगितले की, जीएसटी दरात कपात केल्यामुळे समाजात फील गुड फॅक्टर निर्माण झाला आहे. लोक खर्च करण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता वाढली आहे. उत्सवाच्या काळात याचा फायदा बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रांना होऊ शकेल.
फक्त जीएसटी दर कपातच झालेली नाही तर त्या अगोदर रिझर्व बँकेने व्याजदरात घसघशीत पाऊण टक्क्याची कपात केलेली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात प्राप्ती कर उत्पन्न मर्यादा वाढवून 12 लाख रुपये केली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम घरासारख्या बाजारपेठेवर निश्चितपणे होऊ शकेल.
2025 च्या पहिल्या 6 महिन्यात मूल्यात घर विक्री वाढली असले तरी संख्येत वाढलेली नाही या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. याचा अर्थ घरांच्या जास्त किमतीमुळे ग्राहक घर खरेदी टाळत असल्याचे दिसून येते. सिमेंट उत्पादकानी व इतरांनी त्यांच्या उत्पादनाच्या किमत्या कमी केल्या तर त्या प्रमाणात घरांच्या किमती कमी करण्यास विकसक पुढाकार घेतील असे ते म्हणाले.
किफायतशीर घराची व्याख्या बदलावी –
सध्या 45 लाख रुपयांपर्यंतच्या घराला किफायतशीर घर संबोधले जाते.यावर एक टक्के जीएसटी असतो. तर 45 लाख रुपयांवरील घरावर पाच टक्के जीएसटी असतो. घरावर केंद्र आणि राज्य सरकारचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या 30 ते 45 टक्के कर आहेत. हे कर कमी करण्याच्या शक्यतेवर विचार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर किफायतशीर घराची व्याख्या बदलून 75 लाख रुपयांपर्यंतच्या घराला किफायतशीर घर संबोधले जावे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना जीएसटी कमी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.





