Amit Shah | देशाचे गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार ३४५ वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे अमित शाह हे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. यासाठी शुक्रवारी ते पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील रिट्झ कार्लटन हॅाटेल येथे मुक्कामाला आहेत. प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मुरलीधर मोहोळ स्वागतासाठी उपस्थित होते. रात्री ११ वाजता एकनाथ शिंदे देखील पुण्यात दाखल झाले. यानंतर आज 12 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील महायुतीचे नेते रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सर्वप्रथम पाचाड येथे जाऊन राजमाता जिजाऊच्या समाधीचे दर्शन घेत वंदन केलं. त्यानंतर ते रोपवे परिसरात दाखल झाले आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. रायगडमध्ये अमित शाह यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आल्याचं दिसून येतं आहे. पालकमंत्रिपदाची चर्चा सुरू दरम्यान, अमित शाह यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादामुळे रायगडचं पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आलं होतं. अशातच अमित शाह आज रायगड दौऱ्यावर असल्याने पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भरत गोगावे हे पालकमंत्री व्हावं, असं शिवसेनेतील आमदार, नेत्यांचं म्हणणं आहे तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हेही वाचा: Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळवर हल्ला करणारा पैलवान कोण? पुण्यासह राज्यभरात जोरदार चर्चा