Hockey World Cup 2026 : 32 वर्षांचा वनवास संपवण्याची सुवर्णसंधी हुकली; इंग्लंडने भारताला चारली धूळ
हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत (Hockey World Cup 2026) वेल्सचा ३-१ असा धुव्वा उडवत भारताने धमाकेदार सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्याच सामन्यात भारतीय संघाच्या उत्साहावर विरजण पडले.

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत (Hockey World Cup 2026) वेल्सचा ३-१ असा धुव्वा उडवत भारताने धमाकेदार सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्याच सामन्यात भारतीय संघाच्या उत्साहावर विरजण पडले. स्पर्धेत नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या इंग्लंड संघाने भारताचा २-४ अशा फरकाने पराभव केला.
या पराभवामुळे तब्बल ३२ वर्षांनंतर इंग्लंडला विश्वचषकात (Hockey World Cup 2026) पराभूत करून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारताच्या हातून निसटली. भारताने १९९४ मध्ये इंग्लंडवर अखेरचा विजय मिळवला होता, त्यानंतर आजतागायत भारताला विजयाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या क्वॉर्टरमधील १४ व्या मिनिटाला इंग्लंडच्या निकोलस बंडुरॅकने गोल डागत १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. परंतु, दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारली.
१७ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत बरोबरी साधली, तर पाठोपाठ २५ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने शानदार गोल करत भारताला २-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफपर्यंत सामना पूर्णपणे भारताच्या नियंत्रणात दिसत होता.
पण दुसऱ्या हाफमध्ये सामन्याचे पारडे अचानक फिरले. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडने अतिशय आक्रमक खेळ करत भारतावर दबाव आणला. ३९ व्या मिनिटाला स्टूअर्ट रशमियरने गोल करून २-२ अशी बरोबरी केली, तर ४३ व्या मिनिटाला हेन्री क्रॉफ्टने गोल डागत इंग्लंडला ३-२ ने आघाडी मिळवून दिली.
पिछाडीवर पडलेला भारतीय संघ (Hockey World Cup 2026) चौथ्या क्वॉर्टरमध्ये बरोबरी करण्यासाठी झगडत असतानाच, ५५ व्या मिनिटाला निकोलस बंडुरॅकने सामन्यातील आपला दुसरा गोल करत इंग्लंडची आघाडी ४-२ अशी मजबूत केली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम ठेवत इंग्लंडने भारताचे पुनरागमनाचे सर्व प्रयत्न उधळून लावले आणि भारताला कटू पराभवाचा सामना करावा लागला.






