HIL 2024-25 : महिला संघाला देखील ‘हॉकी इंडिया लीग’चा फायदा होईल – कर्णधार हरमनप्रीत

Hockey India League 2024-25 :- मोठ्या कालावधीनंतर हॉकी इंडिया लीग पुन्हा सुरु होत आहे. या लीगमध्ये पूर्वी केवळ पुरुष संघाचा सामावेश करण्यात येत होता. मात्र, यावर्षीपासून महिला संघ देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगले खेळाडू पुरुष हॉकी संघाला मिळाले आहेत. याच खेळाडूंनी भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले होते. त्यामुळेच या लीगचा फायदा पुरुष संघाला झाला, त्याच प्रमाणे या लीगचा फायदा महिला हॉकी संघाला देखील नक्कीच होईल, असा विश्वास भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने म्हटले आहे.
प्रथमच होणार असलेल्या स्पर्धेत पुरुषांच्या गटातून 8 तर महिलांच्या गटातून 6 संघ या स्पर्धेत उतरणार आहेत. भारतीय पुरुष संघाने पाच दशकांच्या मोठ्या कालावधीनंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे या स्पर्धेचा फायदा मोठ्या प्रमाणात पुरुष संघाला झाला आहे.
या संदर्भात बोलताना हरमनप्रीत म्हणाला, या स्पर्धेतून आम्हाला चांगला वाव मिळाला. आम्हाला चांगल्या खेळाडूंच्या बरोबर आणि त्यांच्या विरुद्ध खेळता आले. त्यामुळेच आम्ही चांगले खेळाडू बनू शकलो, असे हरमनप्रीत सिंग म्हणाला.
तो पुढे म्हणाला, यावेळी या लीगमध्ये महिला संघाचा देखील समावेश करण्यात आल्याने, महिला खेळाडूंना देखील भविष्यात नक्कीच फायदा होईल. भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार असलेला हरमनप्रीत सिंग या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला सुरमा हॉकी क्लब संघाने तब्बल 78 लाख रुपयांमध्ये विकत घेतले आहे.





