PAK vs SA 1st Test : केवळ 4 धावा करूनही बाबर आझमनं रचला इतिहास, कोहली-रोहितच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री…

Pakistan vs South Africa 1st Test (Babar Azam) : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि लंच ब्रेकमध्ये संघाने चार मोठे विकेट गमावले.
एकदिवसीय मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसणारा बाबर बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात फ्लॉप ठरला. बाबर अवघ्या चार धावा करून तंबूत परतला, त्याला डॅन पॅटरसन याने बाद केले. बाबरनं छोटी खेळी केली असली तरी त्यानं असे स्थान गाठले आहे जिथे फक्त विराट कोहली आणि रोहित शर्माच पोहोचू शकले आहेत.
बाबर आझमनं रचला इतिहास…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तीन धावा करण्यासोबतच बाबरने कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. यासह बाबरने असे स्थान गाठले आहे जिथे इतर कोणताही पाकिस्तानी फलंदाज पोहोचू शकलेला नाही. कसोटीत 4,000 धावा, एकदिवसीय सामन्यात 5,000 आणि टी-20 मध्ये 4,000 धावा करणारा बाबर पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे.
तसेच कसोटीत 4 हजार धावा पूर्ण करणारा बाबर पाकिस्तानचा 12वा फलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये बाबरसाठी हे वर्ष काही खास राहिले नाही आणि त्याला या वर्षात अद्यार अर्धशतकही झळकावता आलेले नाही.
कोहली-रोहितच्या क्लबमध्ये झाला समावेश…
बाबर आझमने अशा खास यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे, जिथे फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा पोहोचू शकले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 4 हजारहून अधिक धावा करणारा बाबर केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. बाबरच्या आधी फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा अशी कामगिरी करु शकले आहेत.
हे वर्ष अत्यंत निराशाजनक….
एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबरने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 123 सामन्यांमध्ये 5,957 तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 121 सामन्यात 4,223 धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 56 सामन्यामध्ये (101 डाव) त्याच्या नावे 4,001 धावांची नोंद झाली आहे. तिन्ही फॉरमॅटसह बाबरने आतापर्यंत एकूण 31 शतके झळकावली आहेत. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये बाबरसाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले असून त्याला 9 डावांत 16 च्या अल्प सरासरीने केवळ 152 धावा करता आल्या आहेत.





