HND Pune : एचएनडी जागा विक्रीला प्रखर विरोध! विकासाच्या नावाखाली पवित्र जागा विकू नका ; जैन समाजाची स्पष्ट भूमिका

प्रभात वृत्तसेवा
पुणे – विद्येच्या माहेरघरातील मॉडेल कालनी येथील दिगंबर जैन वसतिगृहाला (एचएनडी) ऐतिहासिक परंपरा आहे. या वास्तूशी, येथील मातीशी आणि मंदिरामध्ये आम्हा सगळ्यांच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली ही जागा विकसकांना विकण्याचा अट्टाहास करू नका. हे केवळ एक वसतिगृह नाही, तर जैन समाजातील गरीब, वंचित आणि देशभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांसाठी ते महत्त्वाचे आश्रय स्थान आहे, असे शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्र्स्टच्या दिगंबर जैन वसतिगृहाच्या (एचएनडी) विक्रीच्या निर्णयाविरोधात मंदिरात शनिवारी (२७ सप्टेंबर) राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत धर्मसभा झाली, त्यावेळी शेट्टी बोलत होते. यावेळी जैन समाजातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होते आणि त्यांनी हे पवित्र वसतिगृह, येथील जैन मंदिर आणि ही जागा वाचवण्यासाठी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
एचएनडीचा जवळपास ३ एकरचा हा भूखंड जैन विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, 1958 च्या ट्रस्ट डीडचे उल्लंघन करून विक्री करण्यात येत असल्याचे यावेळी डीडच्या आधारे सर्वांना सांगण्यात आले. असोसिएशन ऑफ एचएनडी होस्टेल अल्युमनी यांनी अॅड. योगेश पांडे यांच्या मार्फत याबाबत एक याचिका दाखल केली असून, धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या ४ एप्रिलच्या विक्री मंजुरी आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. ट्रस्टकडे ९.७ कोटींची शिल्लक असून, ९.१६ कोटींच्या मुदत ठेवी, तसेच मंदिरातून नियमित देणग्या येत असताना निधीअभावी विक्रीचा दावा करण्यात आला आहे, तो निव्वळ खोटा असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
गेल्या वर्षी ८ कोटी रुपये परस्पर जमिन खरेदीसाठी वळवले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. होस्टेलची इमारत रचनात्मकदृष्ट्या मजबूत असून, 65 वर्षे जुने महावीर मंदिर दुर्लक्षित करून याबाबत क्लिअरन्स देण्यात येऊन या जागेची विक्री करण्यात आली आहे. नव्या आराखड्यानुसार ट्रस्टला केवळ १० हजार चौरस फूट जागा भाडेपट्ट्यावर मिळणार आहे. त्यामुळे येथे असलेले खेळाचे मैदान, सांस्कृतिक सभागृह आणि विद्यार्थ्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असे मुद्दे उपस्थितांनी मांडत, मुळात मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा विकायची का? ही जागा आपण स्वत: विकसित करू मात्र जागा विकू नये अशी प्रभावी मागणी केली.
2 ऑक्टोबरला होणार आंदोलन..
या जागा विक्रीच्या विरोधात संपूर्ण जैन समाज एकत्र येणार असून 2 ऑक्टोबर रोजी एचएनडीच्या समोर लाक्षणिक आंदोलन करण्याचा ठराव झाला. या ठिकाणची एक इंचही जागा जाऊ देणार नाही, येथील एका विटेलाही कोणाला हात लावू देणार नाही, तसेच येथून पुढे कुठेही तोडफोड होऊ देणार नाही असेही ठरवात सांगण्यात आले आहे. ही जागा वाचवून त्याचा विकास करणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे वेळ आली तर भीक मागून आम्ही पैसा जमा करू आणि जागेचा विकास करू; पण ही ऐतिहासिक आणि विद्यार्थ्यांचे आश्रय स्थान असलेले हे ज्ञान मंदिर आणि समाज मंदिर आम्ही विकू देणार नाही.
या वास्तूशी आमच्या भावना जोडलेल्या आहेत. ही जागा पब्लिक ट्रस्टची असल्याने ती विकून त्याचा विकास करण्याचा अधिकार विद्यमान ट्रस्टींना नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने ही वास्तू उभारली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षाच्या फांद्या तोडून पळ्या बसवू नका, वंचित, सोशित विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण देणे, आश्रय देणे हाच उद्देश कायमस्वरूपी ठेवावा. आम्हाला विका पण ही पवित्र वास्तू विकू नका. आज जमीनीला सोन्याचा भाव आहे. त्यात मोक्याच्या ठिकाणी असलेला हा सोन्याचा तुकडा विकू नका, जे करायचे ते इथेच करा. त्यासाठी समाज तुमच्या पाठीशी आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
“तुम्ही जमीन विका, सह्या करा अन्यथा तुमच्या मागे इडी, सीडी लावतो असे म्हणून ही जमीन विकण्यासाठी तुमच्यावर कोणी दबाव आणत असेल, तर आम्हाला सांगा, त्याला लोळवण्याची ताकद आमच्यात आहे. मग कोणी कितीही मोठा असूद्या. निश्चय केला तर मधमाश्यांचे आग्या मोहोळ उठवू. आम्ही शांत आहोत, चर्चा आणि सामजस्यातून हा मार्ग सोडवा. ज्या गोखले बांधकाम व्यावसायिकांचा यामध्ये समावेश आहे, त्यामध्ये मोहोळ यांचे शेअर्स असल्याचे निवडणुकीच्या विवरणपत्रातून दिसून येते. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरली मोहोळ यांनी हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा.”
-राजु शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटना





