HMPV virus in India: भारतात आढळला HMPV चा पहिला रुग्ण, लहान बाळाला लागण

HMPV virus in India: चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातच आता भारतात देखील या व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. बंगळुरू येथे एका 8 महिन्याच्या बाळाला या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. या बाळाने कोठेही प्रवास केलेला नव्हता.
बंगळुरूच्या बॅपटिस्ट हॉस्पिटलमधून या रुग्णाची माहिती समोर आली आहे. याबाबत कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली की, अद्याप आम्ही आमच्या प्रयोगशाळेत संबंधित नमुने तपासलेले नाहीत. तर दुसरीकडे हॉस्पिटलनुसार, ही केस HMPV व्हायरसचीच आहे.
रिपोर्टनुसार, चीनमध्ये आढळलेल्या व्हायरसप्रमाणेच हा व्हेरिएंट आहे की नवीन व्हेरिएंट आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
HMPV व्हायरस म्हणजे काय?
चीनमध्ये पसरणाऱ्या ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. हा एक श्वसन रोग देखील आहे, ज्यामुळे शरीरात फ्लू सारख्या लक्षणांसह समस्या उद्भवतात. हा विषाणू प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन विषाणूने जगासाठी नवीन आरोग्य आणीबाणी निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.
संसर्ग झाल्यानंतर 5 दिवसात त्याची लक्षणे दिसू लागतात. या आजाराची लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे अशा यांचा समावेश आहे. एचएमपीव्ही व्यतिरिक्त, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड -19 ची प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत. त्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
या आजरामुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. खोकल्यामुळे आणि शिंकण्याने व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो. जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर न्यूमोनिया देखील होऊ शकतो. तज्ञ म्हणतात की हा विषाणू नेहमीच असतो, परंतु थंड हवामानात तो अधिक सक्रिय होतो. मात्र याचा त्वरित लोकांना संसर्ग होतो, मात्र त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही म्हंटले आहे. एचएमपीव्ही विषाणूसाठी अद्याप कोणतीही लस नाही.
कोणत्या लोकांना जास्त धोका
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या व्हायरसचा कोणावरही परिणाम होऊ शकतो, परंतु कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. यामध्ये लहान मुलं, वृद्ध लोक आणि कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त लोकांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणांमध्ये 14 वर्षांखालील मुलांचा समावेश दिसून येत आहे.





