Devendra Fadnavis : ‘HMPV’विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे आदेश !

HMPV Virus | Devendra Fadnavis : चीनमध्ये ‘एचएमव्हीपी’ या विषाणुने डोकं वर काढले असून त्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या संबंधीचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या माध्यमांतून समोर येत आहे. यानंतर बंगळूरमध्येही लहान बाळाला या विषाणुची लागण झाली असून नागपूरातही या विषाणुच्या दोन केसेस समोर आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. महापालिकेच्या वतीने त्या दृष्टीने तयारी देखील केली असल्याची माहिती मिळत आहे. नायडू रुग्णालयात साडे तीनशे बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्याविषयी तयारी सुरु केली आहे.
चीनमध्ये या विषाणुने डोकं वर काढल्यानंतर बंगळुरमध्ये या विषाणुची केस आढळली. त्यानंतर नागपूरातही केस आढळली आहे. यामुळे आता आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली आहे. राज्य सरकारने यासंबंधीची बैठक घेत नियमावली तयार केली आहे.
या नियमांच्यानुसारच आरोग्य विभागाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागाला काम करावे लागणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऑनलाईन पध्दतीने संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे आदेश
100 दिवसात प्राधान्याने करावयाची कामे याबाबत आढावा घेतला जाणार आहे. विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा 100 दिवसांचे टार्गेट दिले जाणार असल्याची माहिती आहे. आपल्या वेबसाईट सुसज्ज करा, माहिती अधिकारात मागितली जाते, अशी सर्व माहिती त्यावर आधीच टाका, ती संकेतस्थळे सायबरदृष्ट्या सुरक्षित करा.
कार्यालयांची सफाई करा, अनावश्यक कागदांचे ढीग रिकामे करा. वाहनांचे भंगार साफ करा. कार्यालय स्वच्छ ठेवा. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या सरप्राइज भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. इज ऑफ लिव्हिंग लक्षात घेता किमान 2 सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात कराअसे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.





