नागपूरपाठोपाठ मुंबईतही HMPVची एन्ट्री; ६ महिन्यांच्या चिमुकलीमध्ये आढळली लक्षणे

HMPV Virus in India | चीनमध्ये एचएमपीव्ही रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. कोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा धोका निर्माण झाल्यानं जगभरात खळभळ उडाली आहे. भारतातील पहिला एचएमपीव्ही रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर देशातील इतर राज्यातही या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आले आहे.
महाराष्ट्रातील नागपूरनंतर आता मुंबईत रुग्ण सापडले आहेत. मुंबईत सहा महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. मुंबईतील पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एचएमपीव्हीचे प्रकरण समोर आले आहे. खोकला आणि ऑक्सिजनची पातळी घसरल्याने तिला 1 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आल्याचे हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, देशभरात १० पेक्षा जास्त रुग्ण गेल्या काही दिवसात आढळले आहेत. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दोन रुग्ण आढळल्याची माहिती सोमवारी दिली होती. HMPV Virus in India |
आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले. HMPV Virus in India |
एचएमपीव्ही हा साधारणतः सौम्य आजार आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असतात. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना आजाराचा जास्त धोका असू शकतो. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्भवतो. सद्यस्थितीत भारतामध्ये श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवाढीमध्ये वाढ आढळून आलेली नसून या स्थितीला काळजीचे कारण नाही. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधीसाठा आहे. या आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे करण्यात येत आहे.
नागपूरमध्ये दोन संशयित रुग्ण आढळले
याआधी मंगळवारी (7 जानेवारी) नागपूरमध्ये ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) चे दोन संशयित रुग्ण आढळले होते. सध्या दोन्ही रुग्ण निरोगी आहेत. त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले असून त्यांचे नमुने एम्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये एचएमपीव्हीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
हेही वाचा:





