Container Crash – पिंपळे जगताप आणि करंदी परिसरात रात्रीच्या सुमारास एका मद्यधुंद कंटेनर चालकाने अक्षरशः धुमाकूळ घातला. भरधाव वेगातील कंटेनरने झाडे, भिंती आणि शेडला धडका दिल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र, ग्रामस्थ आणि शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांनी चालक मोहम्मद इम्रान मोमीन (वय ३३, रा. पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एम एच १४ जे एल ७७७९ या क्रमांकाचा कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत सणसवाडी रस्त्याने भरधाव वेगाने येत होता. या प्रवासात कंटेनर एका मोठ्या झाडाला धडकल्याने झाड कंटेनरमध्ये अडकले. तरीही चालक तशाच स्थितीत कंटेनर चालवत राहिला. त्याने पुढे एका विद्यालयाची भिंत आणि शेडलाही जोरात धडक दिली. या थरारानंतर कंटेनर करंदी गावच्या हद्दीत आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई कृष्णा बढे, पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे आणि स्थानिक युवकांनी कंटेनर अडवून चालकाला खाली उतरवले. पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद इम्रान मोमीन याला ताब्यात घेतले आहे. कंटेनरमध्ये अडकलेले झाड जेसीबीने बाजूला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिक आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढील धोका टळल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. शिक्रापूर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.