प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नित्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रशासनाने वाकड-हिंजवडी जोडणारा ३० मीटरचा रस्ता ३६ मीटरवर रुंद करण्याचा प्रस्ताव हाती घेतला होता. मात्र, या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे, ही याचिका खुद्द अजित पवार गटाचेच पदाधिकारी असलेल्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास साखरे यांनी दाखल केली आहे. त्यामुळे ‘कामात अडथळा आणणाऱ्यांना उचलून आत टाका’ अशी गर्जना करणारे अजित पवार, आपल्या कार्यकर्त्याबाबत काय भूमिका घेतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी साखरे यांनी ॲड. माधवी तवानंदी, ॲड. अमित आव्हाड आणि ॲड. सुरज चकोर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी (दि. ८) मा. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि मा. न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने सध्याच्या स्थितीत कोणताही बदल न करण्याचा ‘जैसे थे’ आदेश दिला.आक्षेप नोंदविण्याची संधी नाही. साखरे यांची हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नं. १४६ मधील ६ आर जमीन प्रस्तावित रस्त्यात येते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने कोणतीही पूर्वसूचना, सर्वेक्षण किंवा आक्षेप नोंदवण्याची संधी न देता रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वांचे आणि संविधानातील कलम १४, १९ व ३००A चे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तात्पुरता मिळाला दिलासा.. न्यायालयाच्या स्थगितीमुळे साखरे यांच्या कुटुंबाला तात्पुरता दिलासा मिळाल्याचे वकील ॲड. अमित आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील राजकीय आणि कायदेशीर प्रवास आयटी पार्क परिसरासह शहरभर चर्चेचा विषय ठरणार आहे. तसेच न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे