Hinjwadi | शेतकऱ्यांशी समन्वयातूनच भूसंपादन प्रक्रिया राबवणार ; पीएमआरडीए आयुक्तांचा पुढाकार

प्रभात वत्तसेवा
हिंजवडी – हिंजवडी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या माध्यमातून विविध उपाय योजना करण्यावर भर दिला जात आहे. या भागात नवीन रस्त्यांची आखणी करण्यात येत असून यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हिंजवडी भागातील शेतकऱ्यांशी औंध कार्यालयात संवाद साधला.
भूसंपादन व अन्य बाबीवर त्यांची शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली.भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच निर्णय घेण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, त्यांचे हक्क आणि अधिकारांचा प्रथम विचार करून भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली तर त्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला शासनाकडून मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रस्तावित नवीन रस्त्यांच्या आखणीमुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर होणार असून नागरी समस्या सुद्धा निकाली निघणार आहे. प्रस्तावित रस्त्याच्या आखणीसंदर्भात भूसंपादन प्रक्रिया राबवताना थेट खरेदी, संमतीने खरेदी, टीडीआर आणि इन्सेटिव्ह एफएसआय आदीबाबत शेतकऱ्यांना पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे सविस्तर मार्गदर्शन केले.प्रस्तावित रस्त्याच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया आणि मोबदल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यासह शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने येथील काही आयटी कंपन्या राज्याबाहेर चालल्या आहेत. याची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. या भागातील रस्ते विकसित करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोनवेळा हिंजवडीचा दौरा केला. ग्रामस्थांच्या विरोधानंतरही त्यांनी रस्ता करणार असल्याचे जाहीर केले. या रस्त्याला विरोध करणाऱ्यावर प्रसंगी गुन्हे दाखल करा, असे आदेश पवार यांनी दिले आहेत. बळजबरीने जमिनी ताब्यात घेण्यास हिंजवडी, माणमधील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. प्रसंगी आम्ही गोळ्या खाऊ, असा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर पीएमआरडीए आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
आयुक्तांनी शेतकऱ्यांना केले जाहीर आवाहन..
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील प्रस्तावित रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बाधित शेतकऱ्यांना टीडीआर (TDR) देणार असल्याचे जाहीर केले. तसेच रस्त्याकरिता शेतकऱ्यांनी त्वरीत जामिनीचा ताबा पीएमआरडीएला द्यावा, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. यामध्ये पांडवनगर ते माण गावठाण ते फेस ३ (टी जंक्शन), लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मेझानाईन ते लक्ष्मी चौक, लक्ष्मी चौक ते मारुंजी, शिंदे वस्ती ते जगताप चौक (कासारसाई रोड), मधुबन हॉटेल (PMC हद्द) ते शिवाजी चौक या प्रस्तावित रस्त्यांचा यात समावेश असून संबंधित शेतकऱ्यांनी याचा लाभ घेता येणार आहे.





