Ajit Pawar | अतिक्रमण हटवा, रस्ते वाढवा! – अजित पवारांचा पीएमआरडीएला स्पष्ट इशारा

प्रभात वृत्तसेवा
हिंजवडी – हिंजवडी आणि चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांची समस्या तातडीने सोडवण्यासाठी अतिक्रमणे हटवल्यानंतर लगेच रस्ते रुंदीकरण आणि विकासाची कामे सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) दिले. कामगार वर्गाला दररोज तासनतास कोंडीत अडकावे लागू नये आणि व्यवसायिक वाहतूक सुरळीत रहावी यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयातून ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात चाकण भागातील वाहतूक कोंडी निवारण आढावा बैठकीत पवार बोलत होते. या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी आणि पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, चाकण एमआयडीसी परिसरात अतिक्रमणामुळे अरुंद रस्ते व वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. अतिक्रमण हटवून जर रस्ते विकसित केले नाहीत तर पुन्हा अतिक्रमणे वाढतात. त्यामुळे अतिक्रमणानंतर तातडीने रस्ते रुंदीकरण आणि मजबुतीकरणाची कामे हाती घ्या. कोणी अडथळा आणत असेल तर कायदेशीर कारवाई करा.उपमुख्यमंत्री पवार यांनी एमआयडीसी भागात अवजड वाहनांवर ठराविक वेळेची बंधने घालण्याचे, ट्रॅक टर्मिनल सुरू करण्याचे आदेश दिले.
तसेच आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त नियोजनातून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले. तसेच कचऱ्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे आदेशही दिले.बैठकीत पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडी निवारणासाठी तयार केलेल्या मास्टर प्लॅनचे सादरीकरण चित्रफितीद्वारे केले. त्यात रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने रुंदीकरण, पर्यायी मार्गांची निर्मिती आणि वाहतुकीचे व्यवस्थापन यासंदर्भातील योजना मांडण्यात आल्या.
उपाययोजनांची कामे समाधानकारक..
गेल्या महिन्याभरात हिंजवडी व परिसरातील वाहतूक कोंडी व नागरी समस्यांवर सर्वच यंत्रणांनी केलेली कामे समाधानकारक असून यातून नागरिकांना दिलासा मिळत आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी उर्वरित कामेही याच गतीने करण्याचे निर्देश दिले. चाकण भागातही उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
चाकणसह एमआयडीसी भागात पाहणी..
शुक्रवारी सकाळी अजित पवार यांनी चाकण व एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी व नागरी समस्या पाहणी केली. भारत माता चौक (मोशी), समृद्धी पेट्रोल पंप (सॅनी कंपनी, नाणेकरवाडी), बंगला वस्ती (मेदनकरवाडी रासे फाटा), चाकण चौक, आंबेठाण चौक, कडचीवाडी, हिंगणे चौक (खराबवाडी), म्हाळुंगे पोलिस चौकी एमआयडीसी रस्ता आदी भागांतील अडचणी पाहून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले.





