IT Job Scam – हिंजवडी आयटी पार्क परिसरात नोकरीचे आमिष दाखवून आयटी फ्रेशर्सची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल बाळासाहेब महाडिक (वय ३०, रा. पुणे) व ओमकार दादासो महाडिक (वय २८, रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. पांडुरंग पद्माकर केंद्रे (वय २३, रा. लातूर) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘बॅक डोअर’ एन्ट्रीने आयटी कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष फिर्यादी व इतरांना दाखवण्यात आले. त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे घेतले गेले. आरोपींनी बनावट मुलाखत घेतली. एक लाखांहून अधिक रक्कम आरोपींना दिल्यावर अधिकृत वाटणारे ऑफर लेटर दिले. कन्सल्टन्सी फी, ऑफर लेटर व नोकरी कायम करण्याच्या नावाखाली फिर्यादीकडून दीड लाख रुपये उकळले. त्यानंतर तीन महिने प्रशिक्षणही दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे स्टायपेंट १५ हजार रुपये प्रतिमाह याप्रमाणे तीन महिन्यानंतरही पगार दिला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादीसह शुभम मडोळे, भरत चव्हाण, आदित्य बारस्कर व सिद्धेश पठारे यांच्याकडूनही मोठी रक्कम घेतल्याचे समोर आले आहे. सुरूवातीला एकूण फसवणुकीची रक्कम सुमारे ७ लाख ८० हजार रुपये असल्याचा अंदाज आहे. फिर्यादी पैसे मागण्यासाठी गेल्यावर हिंजवडी फेज-२ येथील गेरा इम्पेरिअल इमारतीतील कार्यालय बंद आढळले. तसेच आरोपींनी आपला मोबाइल बंद करून फरार झाले आहेत. आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता असल्याने फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.