Nilesh Walunj Protest – शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी पुकारलेले सत्याग्रह आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. अधीक्षकांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर वाळुंज यांनी आपले आंदोलन मागे घेतले. पोलीस अधीक्षक गिल्ल यांनी यावेळी स्पष्ट केले की, गावठी दारू आणि अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी जिल्हास्तरीय विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, ज्याची अंमलबजावणी शिरूर तालुक्यापासून सुरू होईल. एमडी सारख्या अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमले जाईल. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती आणि समुपदेशनावर भर दिला जाईल. या बैठकीवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी ‘फ्लाइंग स्कॉड’ नेमण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, राजचिन्हाचा गैरवापर आणि लोकप्रतिनिधींच्या नावाचे बेकायदा स्टिकर लावणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा अवैध धंद्यांमध्ये सहभागी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही गिल्ल यांनी यावेळी दिला. “ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांतून व मार्गदर्शनाखाली देशासाठी काम करीत असताना पोलीस दलाकडून सहकार्य अपेक्षित आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी कायम असून, त्यासाठी आवश्यक पुरावे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केले जातील.” – निलेश वाळूंज, सामाजिक कार्यकर्ते “कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस दल सज्ज असून, काही तक्रारी असतील तर त्यांची योग्य दखल घेऊन कठोर पाऊल उचलले जाईल. सर्वसामान्य जनतेचे हित, गुन्हेगारीला पायबंद आणि गैरधंद्यांवर टाच आणण्याला आमचे प्राधान्य असून, अंमली पदार्थ विरोधी मोहीम यापुढे अव्याहतपणे चालू राहील.” – संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण