Hinjewadi Metro : हिंजवडी मेट्रोला बालेवाडीची जोड; दोन नवी स्थानके प्रवाशांच्या सेवेत!
बालेवाडी हायस्ट्रीट, बालेवाडी फाटा स्थानकांचे उद्घाटन; मेट्रो मार्गावरील कार्यान्वित स्थानकांची संख्या १९ वर

पिंपरी – हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान धावणाऱ्या पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेवरील आणखी दोन स्थानके प्रवाशांसाठी खुली झाली आहेत. बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा या दोन्ही स्थानकांचे बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
दुपारी साडेतीन वाजल्यापासून या स्थानकांवरून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे गुरुवारपासून प्रवाशांना या दोन्ही स्थानकांचा नियमित वापर करता येणार आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयापर्यंतच्या २३.२ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले होते. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा सुरू झाली.
सुरुवातीला या मार्गावरील २३ पैकी १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात आली होती. आता बालेवाडीतील दोन स्थानकांची भर पडल्याने कार्यान्वित स्थानकांची संख्या १९ झाली आहे.दोन्ही स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरएस) मंजुरी मिळाल्यानंतर प्रवासी सेवेसाठी खुली करण्यात आली आहेत.
बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील व्यावसायिक आस्थापना, हॉटेल्स, कार्यालये तसेच बालेवाडी फाटा परिसरातील रहिवाशांना या स्थानकांचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामासाठी जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीला पर्याय उपलब्ध होणार आहे.
सध्या या मार्गिकेवर २० मेट्रो गाड्यांद्वारे दररोज सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. या मार्गावर दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.
दोन नवीन स्थानके सुरू झाल्यामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा मेट्रो प्रशासनाने व्यक्त केली आहे.उर्वरित चार स्थानकेही टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यानंतर संपूर्ण मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
DMS System : इंटरनेटचे बिल थकवले; महापालिकेची डीएमएस यंत्रणा पुन्हा ठप्प!




