Pune Metro : पुणे मेट्रोचा मास्टर प्लॅन जाहीर! २०३० पर्यंत सर्व मार्गिका पूर्ण होणार; डब्यांच्या संख्येतही मोठी वाढ
Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोमुळे वाढणारी गर्दी लक्षात घेता विद्यमान मार्गांवर डबे वाढवणार; महामेट्रोकडून अहवाल तयार.
Pune Metro – हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ अपेक्षित असल्याने आधीच्या दोन मार्गावरील डबे वाढवणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यासाठीचा अहवाल मेट्रो तयार करत असल्याचे ते म्हणाले. सध्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट, वनाझ ते रामवाडी मेट्रोचा दिवसाला २ लाखांच्या आसपास प्रवासी वापर करत आहेत.
त्यांसाठी सध्या तीन डबे वापरात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत एक ते दीड लाखांची वाढ अपेक्षित आहे. मेट्रोला होणारी गर्दी पाहता विस्तारित मार्गिकांसाठी दोन टप्प्यात १२ आणि १५ गाड्या नव्याने दाखल होतील. सध्यादोन मार्गावर ३४ गाड्या चालू असून त्यांना १०२ डबे आहेत. तिसरा मार्ग आणि टप्पा दोनचा विचार करता अजून २७ गाड्या आणि एकूण ८१ डब्बे असतील.
विस्तार, नव्या मार्गिकांचे काम २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. खडकवासला-खराडी मार्ग नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून जाणार असून त्यानुसार या रस्त्यावर उड्डाणपूल उभारल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजीनगर बसस्थानकासंदर्भात महामेट्रो आणि राज्य परिवहनव महामंडळातील कराराचा अंतिम मसुदा तयार झाला असून त्यावर महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल.
त्याला मान्यता मिळाल्यानंतर एसटी स्थानकासाठी निविदा काढून तेथे एसटी स्थानकासह बस पार्किंग उभारले जाणार आहे. तसेच पीपीपी तत्त्वावर जागेचा विकास करण्यात येणार आहे.
मेट्रोचे उद्दीष्ट
-पिंपरी-ते निगडी मार्ग – २०२७
-वनाझ -चांदणी चौक मार्ग – २०२८
-स्वारगेट-कात्रज भुयारी मार्ग – २०२९
-खडकवासला-खराडी मार्ग – २०३०



