पिंपरी | हिंजवडी ग्रामपंचायतीची होणार दप्तर चौकशी?

हिंजवडी, (वार्ताहर) – हिंजवडी ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची तसेच मागील दोन वर्षांत विकासकामांत अनियमितता व गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप होत आहे. सत्ताधारी बहुमताच्या जोरावर अनेक विकासकामे मनमानी पद्धतीने करत असल्याने ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कारभाराची दप्तर चौकशी लावण्यात यावी.
अशी लेखी मागणी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दीपाली जांभुळकर यांच्यासह अन्य सहा सदस्यांनी केली आहे. याबाबत लेखी सह्यांचे पत्र त्यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुळशीच्या गटविकास अधिकार्यांना दिले आहे.
विरोधी गटाच्या सदस्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही सन 2021 ला सदस्य म्हणून निवडून आलो. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी मनमानी पद्धतीने गावचा कारभार चालवला. सन 2020 ते सन 2022 पर्यंत हिंजवडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकासकामांत मंजूर झालेला निधी नियमबाह्य पद्धतीने दुसरीकडे वळवला गेला आहे.
मासिक मिटिंगमध्ये बहुमताच्या जोरावर सत्ताधार्यांकडून नियमबाह्य पद्धतीने कारभार चालवला गेलेला आहे. कोणतेही विकासकाम करत असताना ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक असताना एकाही कामाला ग्रामसभेची मंजुरी घेतलेली दिसत नाही. सदर गैरव्यवहारबाबत ग्रामपंचायतीला चौकशी किंवा विचारणा केल्यास टाळाटाळ केली जाते.किंबहुना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
ग्रामस्थांना आपल्या ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा लेखाजोखा ग्रामसभेच्या माध्यमातून कळवावा लागतो. परंतु सन 2020-2021 व 2021-2022 चा लेखा परिक्षण अहवाल ग्रामपंचायतचे पदाधिकारी व अधिकारी ग्रामसभेपुढे मांडत नाहीत. त्यामुळे आम्ही माहितीच्या अधिकाराखाली सदर अहवाल पुणे कोषागार विभागातून प्राप्त केलेला आहे.
सदरचा अहवाल वाचल्यानंतर धक्कादायक चित्र समोर आलेले आहे. सदरच्या अहवालामध्ये प्रचंड अनियमितता अक्षम्य हयगय व गैरवर्तणुकीमुळे ग्रामपंचायतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. असा ठपका परीक्षण करणार्या ऑडिटरने ठेवलेला आहे. याच कारणामुळे ग्रामपंचायत सदरचा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवत नाहीत.
प्रशासनाने तात्काळ ग्रामपंचायतीला आदेश देऊन विशेष ग्रामसभेची सूचना काढावी व सदरचा अहवाल ग्रामस्थांपुढे मांडण्याच्या सूचना वजा आदेश द्यावा. तसेच ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कारभाराची दप्तर चौकशी लवकरात लवकर लावण्यात यावी, अशी मागणी विरोधी गटाच्या सर्व सदस्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
गावात विकासकामे करत असताना विरोधी सदस्यांनी सूचविलेली कामे अडविण्यात येतात. केवळ बहुमताच्या जोरावर सत्ताधारी कुठलीही कामे रेटून नेतात. टेंडर प्रक्रियेपासून काम पूर्ण होईपर्यंत अनेक ठिकाणी पारदर्शकता ठेवत नाहीत म्हणून ऑडिटरने काही कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला असल्याने करदात्याना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे धाव घेतली आहे.- दीपाली शरद जांभुळकर, उपसरपंच, हिंजवडी.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गावात विकासकामे होत आहेत. परंतु प्रत्येक कामाला विरोध करायचा हे विरोधकांचे कामच आहे. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी दप्तर तपासणीची मागणी केली असेल. परंतु यातून काहीच निष्पन्न होणार नाही. – गणेश जांभुळकर, सरपंच, हिंजवडी.





