Hinjawadi Traffic: हिंजवडीला लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण केव्हा सुटणार? आयटी पार्कच्या ट्रॅफिकवर बैठकीत मंथन
Hinjawadi Traffic: हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात संयुक्त बैठक; पोलीस, एमआयडीसी, पीएमआरडीए आणि आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक समस्येवर सविस्तर चर्चा.

Hinjawadi Traffic – हिंजवडी माण आयटी पार्कमधील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. १४) हिंजवडी ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलिस अधिकारी, आयटी कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांची संयुक्त बैठक झाली. हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
केवळ वाहतूक पोलिसांवर जबाबदारी टाकून प्रश्न सुटणार नसून पर्यायी रस्ते, भूसंपादन, अतिक्रमण, पार्किंग, सेवा रस्ते आणि प्रस्तावित पर्यायी मार्ग यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अनेकांनी विविध उपाय सुचवले अडचणी मांडल्या. हेल्मेटसक्ती व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. पोलीस उपनिरीक्षक वांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिन लोंढे यांनी संयोजन केले.
या बैठकीला वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रदीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील, पंचायत समिती सदस्या ऐश्वर्या वाघमारे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला, प्रशासक गणेश जांभुळकर, पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता वसंत नाईक, सोसायट्याचें प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत रस्त्यांवरील अडथळे दूर करणे, वाहतूक प्रवाहाचे नियोजन करणे, महत्त्वाच्या चौकांत पोलिस नियंत्रण वाढवणे, आयटी कंपन्यांच्या वेळांमध्ये बदल, पर्यायी मार्गांचा प्रभावी वापर याबाबत चर्चा झाली.
रहिवाशांचा प्रश्नांचा भडीमार
हिंजवडीचे ग्रामस्थ प्रकाश काकडे म्हणाले, रस्ते खोदण्यासाठी कोणाच्या परवानग्या घेतल्या जातात आणि काम केल्यानंतर तो रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? कविता सागर म्हणाल्या, २५ हजाराहून अधिक नागरिक वास्तव्य करत असलेल्या मेगा पोलीस सोसायटी परिसरात देखील अशी आढावा बैठक किमान सहा महिन्यातून एकदा घ्यावी. आमच्या समस्यांबाबत कोणीही जबाबदारी घेत नाहीत सर्वजण एकमेकांकडे बोट दाखवतात. यासाठी माणच्या सभागृहात देखील बैठका होणं गरजेचं आहे.





