Hinjawadi IT Hub : आयटी कंपन्यांमध्ये कामगार शोषण? ‘आप’चा गंभीर आरोप, रस्त्यावर उतरण्याचा इशारा
Hinjawadi IT Hub : अचानक कार्यालय बंद करून फ्रेशर्सची फसवणूक; 'आप'चे सरचिटणीस सुभाष करांडे यांची प्रशासन, कामगार विभाग आणि पोलिसांकडे चौकशीची मागणी.

Hinjawadi IT Hub – देशातील प्रमुख आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील अनेक आयटी कंपन्यांविरोधात गंभीर तक्रारी समोर येत आहेत. कामगारांना अनेक महिने वेतन न देणे, नोकरीच्या नावाखाली सिक्युरिटी डिपॉझिट उकळणे, इंटर्न्स आणि फ्रेशर्सकडून विनामूल्य काम करून घेणे, तसेच अचानक कार्यालय बंद करून कर्मचारी व युवकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी पुणे शहर कामगार आघाडीने संबंधित कंपन्यांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली असून, पीडित कर्मचारी, इंटर्न्स आणि फ्रेशर्सना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष कण्याचा इशारा पार्टीने दिला आहे. आम आदमी पार्टी पुणे शहर महासचिव सुभाष करांडे यांनी प्रशासन, कामगार विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणांची तात्काळ चौकशी करून दोषी कंपन्या व व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
युवकांच्या करिअरशी आणि स्वप्नांशी खेळणाऱ्या कंपन्यांना कोणतीही माफी नाही. कामगारांचे शोषण करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल, असे करांडे यांनी सांगितले. पीडित कर्मचारी, इंटर्न्स आणि फ्रेशर्सनी नियुक्तीपत्र, वेतन स्लिप, बँक स्टेटमेंट, चॅट, ई-मेल किंवा इतर पुराव्यांसह संपर्क साधण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच या कामगारांसाठी एखाद्या राजकीय पक्षाकडून पुढाकार घेण्यात आला आहे.




