LPG Shortage : आयटी कर्मचाऱ्यांची मोठी कोंडी; डबा कुठून आणायचा? हिंजवडीतून समोर आले भयाण वास्तव
LPG Shortage : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा खंडित; हजारो आयटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर, काही कंपन्यांच्या कॅटरिंग सेवा स्थगित.

LPG Shortage – आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कपर्यंत पोहोचला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे अनेक आयटी कंपन्यांमधील किचनमधील शेगड्या अक्षरशः विझल्या आहेत. परिणामी हजारो कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असून काही नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना ई-मेलद्वारे दिल्याचे समोर आले आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज हजारो कर्मचाऱ्यांसाठी फूड कोर्ट आणि कॅफेटेरियामधून जेवण तयार केले जाते. मात्र सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कॅफेटेरियातील मेन्यू मर्यादित केला असून लोकप्रिय पदार्थ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. कार्यालयीन कार्यक्रम, मिटिंग किंवा विशेष केटरिंगसाठी दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या सेवाही काही ठिकाणी स्थगित करण्यात आल्या आहेत.
काही कंपन्यांनी बाहेरील किचन किंवा केटरिंगमधून जेवण मागवण्याचा पर्याय वापरण्याचा प्रयत्न केला; मात्र कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तो पुरवठाही अपुरा पडत असल्याची स्थिती आहे. दरम्यान, ‘रिटर्न टू ऑफिस’ धोरणामुळे गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी पुन्हा कार्यालयात येऊ लागले आहेत. त्यामध्ये परराज्यातून आलेले आणि पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहणारे तरुण कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत.
या कर्मचाऱ्यांना स्वतः स्वयंपाक करण्याची सुविधा नसते. त्यामुळे सध्या डबा कुठून आणायचा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सकाळी लवकर कार्यालयासाठी निघणाऱ्या कर्मचाऱ्यांची या परिस्थितीत मोठी गैरसोय होत आहे. हिंजवडी परिसरातील अनेक मेस, खानावळी आणि छोट्या हॉटेलांनाही व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने त्यांनी जेवणाची वेळ बदलली आहे किंवा काही दिवस सेवा बंद ठेवली आहे. गॅसअभावी चहाच्या टपऱ्यांवरही चहा मिळणे कठीण झाले असून आयटी पार्क परिसरात चहा-नाश्त्याचीही तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.
“सध्या सुरू असलेल्या संकटात जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही तोपर्यंत घरून काम करण्याची मुभा मिळणे कठीण आहे. कंपन्या वैयक्तिक पातळीवर निर्णय घेतील. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्यावसायिक गॅस मिळणे बंद झाल्याने कंपन्यांचीही मोठी गैरसोय होत आहे.”
– हर्षल पंडित, सचिव, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज





