काबुल – अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख समुदायाचे नेते निदानसिंग सचदेव यांची सुखरूप सुटका केल्याबद्दल भारतानं अफगाणिस्तान सरकारची प्रशंसा केली आहे. निदानसिंग यांचे गेल्या 22 जूनला पक्तीया प्रांतातल्या चामाकणी जिल्ह्यातून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी काल त्यांना सोडून दिले.
बाह्यशक्तींच्या इशाऱ्यावरून दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक समाजातील सदस्यांना लक्ष्य करणे आणि त्यांचा छळ करणे ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने नुकताच, अफगाणिस्तानात सुरक्षा धोक्यात असणाऱ्या अफगाण हिंदू आणि शीख समुदायाच्या सदस्यांची भारतात परत येण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.