Satara: महामार्गावरील दरोड्याचा 12 तासांत पर्दाफाश; आठ जणांना अटक
Satara 16 ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप पुण्याहून कोल्हापूरकडे निघाली असताना खेड शिवापूर आणि कापूरहोळ येथून तीन मोटारसायकलींवरील आठ जणांनी पिकअपचा पाठलाग केला.

Satara: वाई तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर कोयत्याचा धाक दाखवून कुरिअर पिकअपमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा लुटणार्या आठ जणांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत अटक केली. या कारवाईत तब्बल 1 कोटी 55 लाख 27 हजार 258 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, गोपीनाथ तानाजी कदम, आदित्य हणमंत कदम, निखील दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर (सर्व रा. मालगाव, ता. जि. सातारा) आणि निषीध शरद साबळे (रा. शिवथर, ता. जि. सातारा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
16 ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप पुण्याहून कोल्हापूरकडे निघाली असताना खेड शिवापूर आणि कापूरहोळ येथून तीन मोटारसायकलींवरील आठ जणांनी पिकअपचा पाठलाग केला. कवठे गावच्या हद्दीत महामार्गावर मोटारसायकल आडवी मारून गाडी थांबवली. चालकाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली आणि पाठीमागील दरवाजा उघडून सोन्या-चांदीचे दागिने व चांदीच्या विटांचे पोते लुटून नेले. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. मालगाव येथील संशयितांच्या हालचालींची माहिती मिळताच पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले.
कुरिअरमधील माहितीचा घेतला गैरफायदा
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित गोपीनाथ तानाजी कदम हा कराड येथील कुरिअर कंपनीत कामाला होता. पिकअपच्या वाहतुकीची माहिती असल्याने त्याने इतर साथीदारांना गाडीतील मौल्यवान ऐवजाची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून दरोड्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, पृथ्वीराज ताटे, सुशील भोसले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलिसांच्या पथकाने सहभाग घेतला. कारवाईतील अधिकारी व कर्मचार्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले.





