Satara: जिल्ह्यात बाराशे शेतकऱ्यांना ‘कर्जमुक्ती’ योजनेचा लाभ
Satara राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे व पुनर्गठित कर्जांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

Satara: महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून, पुणे विभागांतर्गत सातारा जिल्ह्यातील १ हजार २०५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे व पुनर्गठित कर्जांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन प्रणालीद्वारे केली जात आहे. यासाठी बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे.
यापूर्वी २४ जुलै रोजी १६.९६ लाख आणि ११ सप्टेंबर रोजी ४.२० लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आता तिसऱ्या यादीतील ३.५१ लाख शेतकऱ्यांसह आतापर्यंत एकूण २४.६७ लाख लाभार्थ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध झाली आहे. लाभार्थ्यांच्या याद्या बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जथकबाकी तपासून जवळच्या आपले सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.आधार प्रमाणीकरणानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यावर जमा होईल. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.





