प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगतदार झाला आहे. माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोण कोण अर्ज माघारी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीसाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. बंडखोर उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊ नये, याकडे लक्ष देत बंडखोर उमेदवारांच्या विनवण्या सुरू आहेत. अपक्ष व बंडखोरांचा फटका कोणाला बसणार याकडे देखील लक्ष आहे. बंडोबा हे थंडोबा होणार की बंडखोर अपक्ष निवडणूक गाजवणार अशी परिस्थिती काही प्रभागात निर्माण झाली आहे. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत वीस प्रभागात ४१ उमेदवार निवडून दिले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, भाजप, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. सोयीचे राजकारण व प्रभागातील मताधिक्य खेचण्यासाठी बंडखोर अपक्ष उमेदवारांसह पक्षातील उमेदवारचे अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यासाठी जास्तीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. प्रभागातील अपक्ष व बंडखोर उमेदवारामुळे अडचण निर्माण झालेले उमेदवार वाटेल ती किंमत मोजण्यास तयार आहेत. अर्ज माघारी घेण्यासाठी अनेकांकडून फिल्डिंग लावली जात आहे. एकाच उमेदवाराने अनेक प्रभागात अर्ज दाखल केल्याने अडचणी निर्माण झाले आहेत. असे अर्ज काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रभागात अर्ज माघारी निघाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रलोभने दाखवली जात आहे. असे उमेदवार प्रलोभनाला बळी पडणार का चुरस निर्माण करणार याकडे लक्ष आहे. नाराजी दूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपात नाराजी निर्माण झाल्याने नाराज उमेदवारांनी तसेच प्रबळ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने मत विभागणीचा धोका निर्माण झाला आहे. मताधिक्य कमी होईल, अशा प्रकारचा कोणताही धोका प्रबळ उमेदवार पत्करणार नाहीत. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घडामोडींना वेग येणार आहे. बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे पक्षश्रेष्ठीकडून देखील शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही उमेदवारांच्या ठाम भूमिकेमुळे धाकधूक वाढली आहे. उमेदवारांच्या खर्चात कपात राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना यासह अन्य पक्षांतील उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. त्यामुळे प्रस्थापित, सत्ताधारी उमेदवारांना जादा पळापळ करावी लागू नये, यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला जात आहे. यातून बंडखोर अथवा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यास निवडणूक सोपी होणार असून खर्चात कपात होणार आहे. त्यासाठी उमेदवार खटाटोप करीत आहेत.