यापुढे भाजपच्या खासदार, नेत्यांची धार्मिक मुद्द्यांवरील वक्तव्य होणार बंद; जेपी नड्डांच्या सूचना

नवी दिल्ली – भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या खासदार आणि नेत्यांना धार्मिक मुद्द्यांवर वक्तव्ये करू नयेत, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या खासदारांसोबत झालेल्या व्हर्चुअल बैठकीत ते म्हणाले की, खासदार आणि पक्षनेते-कार्यकर्त्यांनी सरकारच्या उपलब्धी आणि विकासकामांची चर्चा जनतेसमोर करावी. पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच धार्मिक मुद्द्यांवर भाष्य करतील.
या ऑनलाईन बैठकीत नड्डा म्हणाले की, वादग्रस्त आणि धार्मिक मुद्द्यांवर भाषणबाजी करणे योग्य नाही. ज्यांच्याशी धार्मिक बाबींचा संबंध आहे, तेच हे विषय पाहतील. राजकीय लोकांनी यापासून दूर राहावे. नेहमी लक्षात ठेवा की आमची थीम सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास आहे. प्रत्येकाने या थीमवर काम केले पाहिजे.
आगामी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत पक्षाध्यक्ष नड्डा यांनी खासदारांना जनतेशी संपर्क वाढवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, खासदारांनी विविध क्रीडा स्पर्धा चांगल्या पद्धतीने आयोजित कराव्यात. सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा फायदा सर्वच विभागांना झाला आहे. लोकांशी चर्चा करा या यशाबद्दल आणि जगातील देशाच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपची तयारी जोरात सुरू आहे. भाजप महिला मोर्चाने निवडणुकीपूर्वी ‘निम्म्या लोकसंख्येपर्यंत’ पोहोचण्यासाठी “लाभार्थ्यासमवेत सेल्फी’ (“सेल्फी विथ बेनिफिशरी’) आणि “कमल मित्र मोहीम’ लवकरच सुरू करण्याची योजना आखली आहे. याशिवाय महिलांच्या सन्मानासाठी सुषमा स्वराज पुरस्कारही सुरू केला जाणार आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकायच्या असतील तर महिला मतदार निर्णायक ठरतील असा पक्षाचा विश्वास आहे.
“लाभार्थ्यासमवेत सेल्फी’ कार्यक्रमात एक कोटी लाभार्थींसोबत घेतलेले सेल्फी दिसतील. “उज्ज्वला’ आणि “आयुष्मान कार्ड’ सारख्या योजनांच्या लाभार्थींसोबत माहिती देण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी पक्ष या महिन्यात एक नवीन ऍप लॉन्च करेल. लाभार्थीसोबत सेल्फी कसा घ्यायचा आणि त्यांचा तपशील कसा अपलोड करायचा याचे प्रशिक्षण भाजप महिला शाखेच्या कार्यकर्त्यांना दिले जाईल. सुषमा स्वराज पुरस्कारांतर्गत, महिला मोर्चाने आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रत्येक जिल्ह्यातील 10 प्रभावशाली महिलांना सन्मानित करण्याची योजना आखली आहे.





