“अमित शहाजी जो..” हेमा मालिनींचा शहांच्या प्रशंसेसाठी फिल्मी डायलॉग

नवी दिल्ली – भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. त्यासाठी त्यांनी फिल्मी डायलॉगचा आधार घेतला.अमित शहाजी जो कहते हैं, वो करते हैं. लेकिन जो नहीं कहते हैं, जरूर करते हैं, असे त्या म्हणाल्या.
शहा यांनी मागील आठवड्यात तीन फौजदारी कायद्यांची जागा घेणारी सुधारित विधेयके लोकसभेत सादर केली. त्यावरील चर्चेत हेमा मालिनी सहभागी झाल्या. इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत बनवलेले कायदे नवभारतात अप्रासंगिक बनले आहेत. नवभारताची वाटचाल आता विकसित देश बनण्याच्या दिशेने सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला नव्या उंचीवर नेत आहेत. तर, शांतता, न्याय आणि सुरक्षेच्या निश्चितीसाठी शहा कठोर मेहनत करत आहेत, असे त्यांनी म्हटले. शहा यांच्या कार्याची स्तुती करताना त्यांनी बॉलीवूड चित्रपटातील संवादाचा आधार घेतला. तो संवाद आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार याच्या रावडी राठोड या चित्रपटातील आहे.





