Satara | उमेद अभियानातून महिलांच्या सबलीकरणास मदत

सातारा, (प्रतिनिधी) – उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांमधून महिलांचे सबलीकरण होण्यास मदत होत आहे.
महिलांनी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादित मालाला मार्केट मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. उत्पादनाचे चांगले पॅकेजिंग व लेबलिंग केल्यास योग्य किंमत ही मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती कराड संलग्न नारीशक्ती प्रभाग संघ, कार्वे (ता. कराड) अंतर्गत समुदाय स्तरीय प्रशिक्षण केंद्र उद्घाटनप्रसंगी आ. चव्हाण बोलत होते.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते समुहांना कर्ज मंजुरी पत्राचे वितरण व सेंद्रिय शेती करणाऱ्या महिलांना प्रमाणीकरण प्रमाणपत्र देण्यात आले.
आ. चव्हाण म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केवळ एका महिन्याच्या कालावधीत अद्यावत प्रशिक्षण केंद्र सुरू करुन आपल्या गतीशील कामाची झलक दाखवून दि आहे.
जिल्हा टिम व नारीशक्ती प्रभाग संघ कौतुकास पात्र असून उमेदच्या महिला जिल्हा परिषद राबवत असलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
याशनी नागराजन म्हणाल्या, जिल्हयात गेल्या वर्षभरात ४८ हजार लखपती दिदी आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे. महिलांना विक्रीसाठी खात्रीशीर बाजारपेठ मिळावी या हेतूने पाचगणी येथे मॉल उभारणी करण्यात येणार आहे.
प्रताप पाटील यांनी कराड उमेद विभागाचे माध्यमातून कराड जत्रा, बांबू महोत्सवाचे यशस्वी आयोजन बरोबर चालू वर्षात समुहांना २० कोटीचे बँक कर्ज अर्थसहाय्य व्यवसायासाठी देण्यात आल्याची माहिती दिली.
शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षण केंद्राद्वारे उमेद अंतर्गत कार्यरत संसाधन व्यक्ती, विविध शासकीय विभागांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
या प्रशिक्षण केंद्रांमधून विविध विषयांचे प्रात्यक्षिक व क्षेत्र भेटीतून महिलांना आत्मनिर्भर करणे तसेच समुदाय संचलित संस्थेला अर्थार्जन व्हावे व त्यासोबतच ग्रामीण गरीब कुटुंबातील महिलांना सर्व सोयींनी युक्त प्रशिक्षण केंद्र उपलब्ध व्हावे व याच्या माध्यमातून सर्वांची क्षमता बांधणी व्हावी हा उद्देश आहे.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, मनोजकुमार राजे, संजय निकम, खंडाळा, वाई, खटाव तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण खुडे, पूनम गायकवाड, ऋषीकेश जाधव, नारीशक्ती प्रभाग अध्यक्ष वैशाली थोरात, दीपाली जाधव, स्वाती भोसले यांच्यासह उमेद कराड टिमचे सदस्य उपस्थित होते.
वैशाली थोरात यांनी प्रास्ताविक केले. धनंजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार, प्रभाग समन्वयक चिन्मय वराडकर व उमेद तालुका टीम यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्वे प्रभागातील महिला उपस्थित होत्या.





