Pune : नवभारतासाठी स्त्रियांना सक्षम करावे

पुणे : नवभारत एका पायावर धावू शकत नाही, तर तो दोन पायांवरच चालवायला लागेल. त्यासाठी स्त्रियांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रिया व मुलींना भरपूर शिक्षण द्या; पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य, हे सूत्र सतत लक्षात ठेवावे, असा सल्ला प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.
‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम सीओईपीच्या किर्लोस्कर सभागृहात पार पडला. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक संदीप नूलकर, सचिव प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रूपाली शिंदे- आगाशे आदी उपस्थित होते.
संस्थेच्या हिरकणी योजनेअंतर्गत या वर्षी गायत्री रावडे, दिया दिघे आणि पियुषा पांडव या तीन मुलींना स्वावलंबी होईपर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती डाॅ. माशेलकर यांच्या हस्ते देण्यात आली. बासमती तांदूळ व हळद पेटंट करू पाहणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या विरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्यासाठी याप्रसंगी डॉ. माशेलकर यांना बासमती तांदूळ आणि हळदीची प्रतीकात्मक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. माशेलकर म्हणाले, आपल्या देशात बेटी बचाव बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, सेविंग स्कीम, कन्या श्री प्रकल्प व शिक्षणाच्या योजना आहेत. त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे. देशात आजही अंधश्रद्धा दिसून येते. चंद्रावर मंगळ यान पोहोचले; परंतु देशात अजून मंगळ असल्या कारणाने मुलींची लग्न ठरत नाहीत, ही विचार करण्याजोगी बाब आहे.





